मनोहर कुंभेजकर
मुंबई : कांदिवली पूर्व येथील ईएसआयएस हॉस्पिटलला कोविड रुग्णांसाठी १५० आॅक्सिजनयुक्त सुविधांसह १०० अतिरिक्त आयसीयू बेड मिळणार आहेत. यासंदर्भात १८ मेच्या लोकमत आॅनलाइन व लोकमतच्या १९ मेच्या अंकात वर्सोवा येथील ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला येथील ईएसआयएस हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटर मिळाला नसल्याने त्याचा मृत्यू झाला हे सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या भाजप आमदार डॉ. भारती लव्हेकर यांनी सदर घटना उघडकीस आणली होती.
लोकमतच्या सदर वृताची गंभीर दखल घेत उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी या ठिकाणी आॅक्सिजनयुक्त अतिरिक्त आयसीयू बेड व या हॉस्पिटलचे कोविड हॉस्पिटल (डीसीएच)मध्ये रूपांतरित करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारशी पाठपुरावा केला. खासदार गोपाल शेट्टी यांच्या प्रयत्नांमुळे कांदिवलीतील ईएसआयएस हॉस्पिटलला डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच)मध्ये रूपांतरित करण्यात मदत झाली आहे. मुंबईत कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये वाढ होत असताना हे हॉस्पिटल पूर्ण वापरात नाही, कारण केंद्र सरकार किंवा राज्य सरकार हे हॉस्पिटल कोणाद्वारे चालविते व व्यवस्थापित करेल याचा विचार केला जात नव्हता. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना केंद्र सरकारने ७ मे रोजी राज्य सरकारला पत्र लिहून या हॉस्पिटलचा पूर्ण क्षमतेने वापर करून येथे अतिरिक्त व्हेंटिलेटर व अन्य सुविधा उपलब्ध करा, अशी मागणी केली होती. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडची संख्या वाढविण्यासाठी आवश्यक ते त्वरित लक्ष देण्याची विनंती खासदार गोपाळ शेट्टी यांनी १९ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना पत्राद्वारे केली होती.गोपाळ शेट्टी यांच्या सतत पाठपुराव्यानंतर या हॉस्पिटलचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्णय घेतला. येथे बेडची क्षमता वाढवण्यासाठी आणि सुसज्ज पूर्ण फंक्शनल बेड्स, आयसोलेशन बेड्स, आयसीयू बेड्ससह येथील ईएसआयएस हॉस्पिटल पूर्णपणे डीसीएचमध्ये रूपांतरित करण्याचे काम सुरू केले आहे. कोविड रुग्णांवर उत्तम प्रकारे उपचार करण्यासाठी येथे व्हेंटिलेटर,तसेच आता नव्याने वाढलेल्या आॅक्सिजनयुक्त आणि आयसीयू बेड्समुळे उपचार घेणे खूप फायदेशीर ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.