Join us

विद्यापीठ, महाविद्यालयांत कोविड टास्क फोर्ससह मदत कक्ष स्थापन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 4:06 AM

यूजीसीच्या सूचनालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे आणि ...

यूजीसीच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे आणि एकमेकांना आवश्यक सहकार्य करण्याची गरज आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील प्रत्येक विद्यापीठ, महाविद्यालयीन प्रशासनाने विद्यार्थी, प्राचार्य आणि इतर घटकांच्या मार्गदर्शनासाठी आपल्या संकुलात कोविड टास्क फोर्स आणि हेल्प लाइन्स सुरू कराव्यात, अशा सूचना यूजीसीने दिल्या.

महाविद्यालये आणि विद्यापीठांतून कोविड काळात हात धुणे, मास्क घालणे, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग राखणे, टेस्टिंग, ट्रेसिंगसाठी विविध माध्यमांतून जनजागृतीचे काम काम हाती घ्यायला हवे. यामधून विद्यार्थ्यांची जनजागृती होईलच. शिवाय समाजातील मोठ्या समुदायापर्यंत या सूचना पोहोचतील, याची काळजी शैक्षणिक संस्थानी घ्यावी, असे यूजीसीने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांत म्हटले आहे. प्रशिक्षित आणि इत्थंभूत माहिती असणाऱ्या एनसीसी आणि एनएसएस टीमची स्थापना शैक्षणिक संस्थांमध्ये करावी, जेणेकरून कोविड काळात कोणालाही मदत लागल्यास त्यांना यांच्या साहाय्याने मदत पोहोचविणे शक्य होईल. साेबतच विद्यापीठामध्ये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थी आणि भागीदारांसाठी, त्यांचे मानसिक आरोग्य जपण्यासाठी समुपदेशक, सल्लागार यांची नियुक्ती करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

- मे महिन्यात ऑफलाइन परीक्षांचे आयाेजन नाही!

देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यूजीसीने नोटीस जारी करून सर्व विद्यापीठांना मेमध्ये ऑफलाइन परीक्षा आयोजित न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेऊन ऑनलाइन परीक्षा आयोजित कराव्यात, असे म्हटले आहे. जूनमध्ये परिस्थिती पाहून परीक्षांचा निर्णय घ्यावा, असेही म्हटले आहे. मात्र, या सूचनांचा चुकीचा अर्थ काढून मागील वर्षीप्रमाणे पहिल्या व दुसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविण्याच्या सूचना दिल्याच्या चुकीच्या व खोट्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, अशा कोणत्याही सूचना यूजीसीने दिल्या नसल्याचे आयोगाने स्पष्ट केले.

.............................