कोल्हापूरसाठी हेरिटेज समिती स्थापन करा
By admin | Published: April 22, 2017 01:13 AM2017-04-22T01:13:48+5:302017-04-22T01:13:48+5:30
उच्च न्यायालयाने फटकारले : शासनास चार आठवड्यांचा दिला कालावधी
कोल्हापूर : कुरुंदवाड नगरपालिकेचा दुटप्पीपणा शुक्रवारी उच्च न्यायालयात उघडा पडला. न्यायालयाने कोल्हापूर जिल्ह्यासाठी हेरिटेज समिती स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला निर्णय घेण्याचे आदेश दिले असताना कुरुंदवाड नगरपालिकेने आपल्या सर्वसाधारण सभेत हेरिटेज समिती स्थापन करण्याची गरजच नसल्याचा आश्चर्यकारक पवित्रा घेतला त्यावर उच्च न्यायालयाने फटकारत जिल्हाधिकारी कोल्हापूर व राज्य शासनास कोल्हापूर जिल्ह्यासाठी चार आठवड्यांत हेरिटेज समिती स्थापन करण्यासंबंधी निर्णय घेण्याचे आदेश दिले. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनंतर होणार आहे.
भालचंद्र टॉकीज व इतर ६ वस्तू ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करून त्यासंबंधी वारसा संवर्धन समिती स्थापन करावी व तोपर्यंत भालचंद्र टॉकीजच्या वास्तूमध्ये कोणतेही बदल करू नयेत, असे आदेश राज्य शासन व कुरुंदवाड नगरपरिषदेस देण्याची विनंती करणारी याचिका कुरुंदवाड येथील सामाजिक कार्यकर्ते कृष्णा लोकरे व इतर चौघांनी मुंबई उच्च न्यायालयात वकील धैर्यशील सुतार यांच्यावतीने दाखल केली आहे.
या जनहित याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती श्रीमती मंजुळा चेल्लूर व गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.
याचिकाकर्त्यातर्फे वकील सुतार यांनी बाजू मांडली. २२ फेब्रुवारी २०१७ च्या सर्वसाधारण सभेत नगरपालिकेने हेरिटेज समिती स्थापन करण्याची गरजच नसल्याचा ठराव केल्याचे निदर्शनाला आणून दिले.त्यावर नगरपालिकेच्यावतीने वकिलांनी आम्ही जिल्हाधिकारी कोल्हापूर यांना यासंबंधी निर्णय घेण्याविषयी विनंती केली असल्याचे सांगितले. त्यावर मुख्य न्यायमूर्र्तींनी कुरुंदवाड नगरपालिका व राज्य शासनाला खडे बोल सुनावले. पुढील चार आठवड्यांत हेरिटेज समिती स्थापन करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या या आदेशाने चांगलीच खळबळ उडाली आहे.
कुरुंदवाड हे संस्थानकालीन शहर असून, त्याचे संस्थान अधिपती हे पटवर्धन घराणे होते. त्या पटवर्धन संस्थानिकांनी त्यांच्या कार्यकालामध्ये कला, संस्कृती व खेळास प्रोत्साहन देणेसाठी कृष्णा घाट व त्याचे परिसरातील वस्तू, विष्णू मंदिर, गणपती मंदिर, भालचंद्र टॉकीज, गणपती रेसलिंग थिएटर, सध्याची सीताबाई पटवर्धन माध्यमिक विद्यालयाची इमारत, टेनिस क्लब ह्या वस्तू बांधल्या.
दर्ग्यामधील भूगंधर्व रेहमत खान यांची समाधी अशा सर्व वस्तू ह्या ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आहेत. त्यामुळे ह्या जतन करणे जरूरी आहे व तसे करणे हे केंद्र सरकारने जारी केलेल्या हेरिटेज नियमावलीप्रमाणे नगरपालिकेवर बंधनकारक आहे; पण कुरुंदवाड नगरपालिकेने भालचंद्र टॉकीजची भव्य आणि ऐतिहासिक वास्तू सुस्थितीत असतानासुद्धा पाडून त्याजागी शॉपिंग सेंटर बांधण्याचा ठराव मंजूर केला होता. त्यावर ह्या आधीच उच्च न्यायालयाने स्थगिती देत भालचंद्र थिएटर पडण्यास मनाई केली आहे.