कोकणातील अडीच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 03:34 AM2020-01-11T03:34:15+5:302020-01-11T03:34:23+5:30

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड या अडीच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे.

Establish a separate university for two and a half districts in Konkan | कोकणातील अडीच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार

कोकणातील अडीच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणार

Next

मुंबई : रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि दक्षिण रायगड या अडीच जिल्ह्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात राज्य शासनाला शिफारस करण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमण्यात येणार आहे. उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शुक्रवारी ही घोषणा केली.
हे विद्यापीठ स्थापन केल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना होणारा त्रास कमी होईल आणि मुंबई विद्यापीठावर येणारा प्रशासकीय भार कमी होईल. यासाठी हे विद्यापीठ स्थापन होणे आवश्यक आहे. कोकण विभाग हा समुद्र किनारपट्टी असलेला भाग आहे. त्यासाठी स्थानिकांच्या गरजा लक्षात घेऊन समुद्र विज्ञान, नारळ संशोधन, संशोधन प्रक्रिया, उद्योग, पर्यटन, व्यापारी जहाज वाहतूक असे व्यवसायिक अभ्यासक्रम तयार करावेत. त्यामुळे स्थानिकांना रोजगाराभिमुख शिक्षण घेता येईल, असे सामंत यांनी बैठकीत सांगितले. या बैठकीला उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, संचालक धनराज माने उपस्थित होते.
संत विद्यापीठासाठी समिती
पैठण येथे संत वारकरी विद्यापीठाची निर्मिती व्हावी अशी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. या विद्यापीठाच्या निर्मितीसाठी शासन सकारात्मक असून त्यासाठी एक समिती गठित करण्यात यावी. या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातील तज्ज्ञ असलेल्या व्यक्तींचा समावेश असावा, असेही सामंत यांनी सांगितले.
यशपाल समितीचीही शिफारस
देशात विद्यापीठांची संख्या वाढविण्याची शिफारस नॅशनल
नॉलेज कमिशन, यशपाल समितीने पूर्वीच केलेली होती. एका विद्यापीठास १५० पेक्षा अधिक महाविद्यालये संलग्न असू नयेत, असे मत त्यांनी व्यक्त केले होते. देशात जवळपास ४० हजारांहून अधिक महाविद्यालये आहेत. त्यातील ८७ टक्के महाविद्यालयांमध्ये ५०० पेक्षा जास्त विद्यार्थीसंख्या नाही. ५० पेक्षा कमी संख्या असलेली सात टक्के महाविद्यालये आहेत.
नव्या शैक्षणिक धोरणाच्या आराखड्यानुसार, विद्यापीठांची संख्या वाढविण्याची जोरदार शिफारस करण्यात आली आहे.
>सध्या ८१० महाविद्यालये
सध्या मुंबई विद्यापीठांतर्गत मुंबई शहर, उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हे जिल्हे आहेत. या विद्यापीठात तब्बल ८१० महाविद्यालये आहेत.
>व्यवहार्यतेचा प्रश्न : नवीन विद्यापीठे ही बरेचदा आर्थिक व्यवहार्यतेचा विचार न करता स्थापन केली जातात आणि ती बरीच वर्षे आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होत नाहीत. गडचिरोली, सोलापूर विद्यापीठाचे उदाहरण याबाबत देता येईल, असे काही शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Web Title: Establish a separate university for two and a half districts in Konkan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.