मुंबई : मुंबई महानगर क्षेत्रातील कोरोना बाधितांचा मृत्यू दर कमी करणे आणि कोरोनाची तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांवरील उपचारांसाठी आदर्श कार्यप्रणाली निश्चितीसाठी राज्य सरकारने नऊ सदस्यीय तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. डॉ. संजय ओक यांच्या नेतृत्वाखालील या समितीने अभ्यास करून तातडीने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करावा, असे आदेश देण्यात आले आहेत.
कोरोनाच्या राष्ट्रीय आणि आंतराष्ट्रीय मृत्यूदरापेक्षा मुंबई महानगर क्षेत्रातील मृत्यू दर मोठा आहे. हा मृत्यूदर कमी करण्यास आवश्यक उपाय सुचविण्यासाठी सरकारने नऊ तज्ज्ञ डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. याशिवाय, कोरोनाची तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांचे नियोजन, त्यांच्यावरील उपचारांची आदर्श कार्यप्रणाली सुचविण्याचे काम या समितीला देण्यात आले आहे. शिवाय, मुंबई क्षेत्रातील सर्व सहा कोविड रुग्णालयात उपचारांत समानता, सुसूत्रता असावी यासाठीही या समितीने प्रणाली निश्चित करायची आहे. याशिवाय, कोरोनाची तीव्र लक्षणे असणाºया रुग्णांना कोविड स्पेशालिटी रुग्णालयात अथवा गरजेनुसार अन्यत्र हलविण्यासाठी नियम समितीला सूचवायचे आहेत.
तसेच, कोविड स्पेशालिटी रुग्णालयातील डॉक्टरांसह वैद्यकीय सेवक, कर्मचारी यांच्या गरजा, त्यांना लागणारी साधनसामग्रीबाबतही ही समिती शिफारस करणार आहे. ही टीम एकीकडे राज्य शासनाला वैद्यकीय उपचारांबाबत मार्गदर्शन करेल. तसेच राज्यभरातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना आळीपाळीने हॉटलाईनवर सहाय्य करेल. डेडिकेटेड कोविड रुग्णालय सुरू करणे, तेथील वैद्यकीय व्यवस्था, प्रत्येक रुग्ण कोविडग्रस्त समजून उपचार सुरू करणे, चांगल्या सुसज्ज रुग्णवाहिका, कोविड आयसीयूमधील उपचार पद्धती यावर व अनुषंगिक उपचारांवर ही टीम देखरेखही ठेवून सल्लाही देईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या तज्ज्ञ डॉक्टरांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.टास्क फोर्समधील डॉक्टरडॉ. संजय ओक (डॉ. डी.वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू) डॉ. झहीर उडवाडिया (हिंदुजा रुग्णालय)डॉ. संतोष नागांवकर (लिलावती रुग्णालय) डॉ. केदार तोरस्कर (वोक्हार्ट रुग्णालय) डॉ. राहुल पंडित (फोर्टीस रुग्णालय) डॉ.एन.डी. कर्णिक (लोकमान्य टिळक रुग्णालय, शीव) डॉ. झहिर विरानी (पी.ए.के. रुग्णालय) डॉ. प्रविण बांगर (केईएम रुग्णालय) आणिडॉ. ओम श्रीवास्तव (कस्तुरबा रुग्णालय) यांचा समितीत समावेश.