महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची केली स्थापना; राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2023 11:41 AM2023-06-18T11:41:29+5:302023-06-18T11:41:47+5:30
प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. राज्यातील शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली आहे.
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणामार्फत पारदर्शक पद्धतीने खरेदी प्रक्रिया राबवावी. रुग्णालयांमध्ये औषधांचा तुटवडा जाणवणार नाही यासाठी वेळेवर औषधे आणि उपकरणे उपलब्ध होतील, याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले. हे प्राधिकरण म्हणजे क्रांतिकारक पाऊल असून त्याच्या स्थापनेमागचा हेतू चांगला असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितले.
प्राधिकरणाचे काम लवकरात सुरू करावे. या संस्थेची विश्वासार्हता वाढविण्याच्या सूचना देतानाच प्राधिकरणाची कार्यपद्धती पारदर्शक राहिल्यास खासगी रुग्णालये देखील या माध्यमातून औषधे खरेदी करू शकतील, असा विश्वासही एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, मुख्य सचिव मनोज सौनिक आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरणाची पहिली बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. शासकीय, निमशासकीय आरोग्य संस्थांसाठी औषधे, वैद्यकीय उपकरणे यांच्या खरेदीमध्ये सुसुत्रता ठेवण्यासाठी महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी… pic.twitter.com/JsZbT1qihB
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 17, 2023
महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण बैठकीतील निर्णय :
- सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागासाठी लागणारे औषधे, वैद्यकीय उपकरणे यांची खरेदी करण्यासाठी प्राधिकरणाचा निर्णय. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या ८ वरिष्ठ पदांना बैठकीत मान्यता.
- भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी या प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहणार.
- सध्या आरोग्य विभागाच्या आयुक्तांना या पदाचा तात्पुरता कार्यभार देण्याचा निर्णय.
- प्राधिकरणाचा कार्यक्रम आराखडा, २७०० विविध औषधे आणि साहित्य खरेदी, कंत्राटी पद्धतीने पदभरती आदी विषयांवर चर्चा