मुकुंद पाठक
सिंदखेडराजा (जि. बुलडाणा) : ‘बार्टी’ या संस्थेच्या धर्तीवर खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी ॲकेडमी ऑफ महाराष्ट्र रिसर्च, अपलिफ्टमेंट अँड ट्रेनिंग (एएमआरयूटी अर्थात ‘अमृत’) या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून खुल्या वर्गातील गरजूंना मोठा लाभ पोहचविण्याचे काम सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे.
या संदर्भातील शासन निर्णय सोमवारी जारी झाला असून सरकारने संस्थेच्या सर्वंकष घटनेला मंजुरी दिली आहे. संस्थेची नोंदणी रजिस्ट्रेशन ॲक्ट १८६० आणि सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० (मुंबई अधिनियम २९) नुसार करण्यात येणार आहे. इतर मागास बहुजन कल्याण विकास विभागाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल असलेल्या विद्यार्थी, युवक, युवतींसाठी या संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे. यामध्ये अधिकारी-कर्मचारी व लोकप्रतिनिधींचे प्रशिक्षण, योजनांचे सर्वेक्षण आणि मूल्यमापन, संशोधन, विविध स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण, हॉर्टीकल्चर प्रशिक्षण इत्यादी कामे केली जाणार आहेत. खुल्या गटातील गरजू घटकांचे संशोधन, उन्नती आणि प्रशिक्षण हाच या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या संस्थेची स्थापना व्हावी यासाठी राज्यातील अनेक सामाजिक संघटनांनी या संदर्भात सरकारकडे पाठपुरावा केला होता. लवकरच ही संस्था कार्यान्वित होईल, असे सांगितले जात आहे.