मुंबई - भारतीय प्लास्टिक उद्योगामध्ये सर्वोत्तम गोष्टी आणि तंत्रज्ञान यावे, त्यांचा अवलंब या क्षेत्रामध्ये व्हावा आणि सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांमध्ये हा बदल व्हावा या उद्देशाने ऑल इंडिया प्लास्टिक्स मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने नुकतीच मुंबईत ‘अरविंद मेहता टेक्नॉलॉजी अँड एन्टरप्रीनरशिप सेंटर’ची स्थापना केली आहे.
अरविंद मेहता यांनी त्यांच्या कारकिर्दीची तीस वर्षे प्लास्टिक उद्योग आणि ‘एआयपीएमए’साठी ज्या तडफदार सेवाभावनेने आणि समर्पितपणे व्यतीत केली त्याचा गौरव म्हणून हे केंद्र त्यांच्या नावाने ओळखले जाणार आहे, अशी घोषणा असोसिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत तुराखिया यांनी केली.
‘ॲमटेक’ने ‘सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर प्लास्टिक प्रॉडक्ट इनोव्हेशन ॲण्ड ॲप्लिकेशन’ची स्थापना करत असल्याचे जाहीर केले आहे. त्या माध्यमातून प्लास्टिक आणि तत्संबंधी वापर, उद्योगक्षेत्रामध्ये उच्च दर्जाचे ज्ञान आणि उद्योग सेवा उपलब्ध व्हावी व त्यातून झपाट्याने वृद्धी साधली जावी, हे उद्दिष्ट आहे. एमएसएमईना डिझाईन, विकास आणि उत्पादनांच्या निर्मितीसाठी लागणारा वेळ कमी होईल. त्याद्वारे बाजारपेठेची गती वाढेल. या केंद्राच्या माध्यमातून भारतीय बाजारपेठेचा जागतिक बाजारपेठेतील हिस्सा पुढील तीन वर्षांमध्ये १० अब्ज अमेरिकन डॉलरवरून २० अब्ज अमेरिकन डॉलर एवढा वाढवता येईल, असे तुराखिया यांनी स्पष्ट केले.