दहावी निकालाचे संकेतस्थळ क्रॅशच्या चौकशीसाठी समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:06 AM2021-07-18T04:06:07+5:302021-07-18T04:06:07+5:30

शालेय शिक्षण आयुक्त असणार अध्यक्ष : १५ दिवसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीच्या निकालाच्या ...

Establishment of a committee to investigate the 10th crash website crash | दहावी निकालाचे संकेतस्थळ क्रॅशच्या चौकशीसाठी समिती स्थापन

दहावी निकालाचे संकेतस्थळ क्रॅशच्या चौकशीसाठी समिती स्थापन

Next

शालेय शिक्षण आयुक्त असणार अध्यक्ष : १५ दिवसांना अहवाल सादर करण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीच्या निकालाच्या दिवशी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ क्रॅश झाल्याने गोंधळ उडाला होता. या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शुक्रवारीच चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार शालेय शिक्षण विभागाकडून दहावीचा निकाल घोषित करताना उद्भवलेल्या त्रुटींसंदर्भात ५ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीने शासनाला १५ दिवसांत अहवाल सादर करावा, असे आदेश शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आले आहेत.

शालेय शिक्षण आयुक्त हे या समितीचे अध्यक्ष असतील. याशिवाय माहिती व तंत्रज्ञान संचालनालयाचे सचिव, उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाचे उपसचिव, शालेय शिक्षण विभागाचे तांत्रिक सल्लागार हे या समितीचे सदस्य म्हणून काम पाहतील, तसेच उपसंचालक, आयुक्त शिक्षण हे या समितीचे सदस्य सचिव असतील. निकालापूर्वी राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी सर्व संबंधितांची बैठक घेतली होती का याची चौकशी ही समिती करणार आहे. याशिवाय निकाल घोषित करण्यासंबंधात राज्य मंडळातील संबंधित तांत्रिक सल्लागारांना याबाबत पूर्वसूचना देण्यात आली होती का? संकेतस्थळाची देखभाल करणाऱ्या संबंधित कंपनीला निकाल घोषित करण्यासंबंधी पूर्वसूचना दिली होती का? दहावीच्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी असल्याने निकाल घोषित करण्याआधी संकेतस्थळाची पूर्वतपासणी करण्यात आली होती का? या सगळ्या प्रश्नांच्या अनुषंगाने ही समिती चौकशी करणार आहे.

विद्यार्थीसंख्येचा मोठा ताण एकाच वेळी संकेतस्थळाच्या सर्व्हरवर आल्याने संकेतस्थळ क्रॅश झाल्याची प्राथमिक माहिती मंडळाने दिली होती. मग निकाल घोषित करण्यासाठी आवश्यक क्षमतेच्या सर्व्हरचा वापर केला नव्हता का याचीही चौकशी करण्यात येईल. शिवाय अशी स्थिती उद्भवू नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याचाही आढावा समितीकडून घेण्यात येणार आहे. संकेतस्थळ क्रॅशमुळे झालेल्या गोंधळाबाबत अधिकारी/कर्मचारी यांच्यावर अंतिम जबाबदारी चौकशीनंतर समितीकडून निश्चित करण्यात येणार आहे.

Web Title: Establishment of a committee to investigate the 10th crash website crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.