मुंबई : राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. या मंडळाच्या माध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा झाला आहे, असा विश्वास सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील एक विख्यात व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असेल. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार आहे.
आधी फुटबॉल मग निर्णयतृतीयपंथीयांसाठी कल्याण मंडळ स्थापन करण्याचे आश्वासन विद्यमान राज्य सरकारने पहिल्याच वर्षी दिले होते पण तीन वर्षे काहीही झाले नाही. ?हा विषय महिला व बालकल्याण विभागाकडे रेंगाळला व नंतर त्याचा फुटबॉल करून तो सामाजिक न्याय विभागाकडे देण्यात आला. साडेचार वर्षांनंतर आज निर्णय झाला.मंडळाच्या वतीने काय करणार?तृतीयपंथीयांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल. मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल.पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत वार्षिक ४८ हजार ते ६० हजार रूपयांपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळेल.सुशिक्षित तृतीय पंथीयांसाठी कौशल्य विकासाच्या योजना राबवल्या जातील.तसेच आवास योजना राबवण्यात येईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी व उपचारांसाठी शिबिरे आयोजित केली जातील. व्यसनमुक्तीचे कार्यक्रमही राबविण्यात येणार आहेत.कल्याण मंडळाच्या स्थापना सरकारने लवकरात लवकर करून कल्याणाच्या योजनांना गती द्यावी. आश्वासनाची पूर्ती तीन-चार वर्षांनंतर का होईना पण झाली याचे समाधान आहे.- प्रिया पाटील, प्रकल्प अधिकारी, किन्नरमा एक सामाजिक संस्था.