लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना काळात अखंडित वीजपुरवठा देण्याकरिता झटत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मास्क, सॅनिटायझरचा नियमित वापर करावा. सामाजिक अंतर पाळणे या महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष द्यावे. सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लस लवकरात लवकर घ्यावी. कोरोना महामारीचा संकटात सदर रोगापासून संरक्षण मिळवून देण्यासाठी, कोरोनाचा संसर्ग झाल्यास तातडीने इलाज उपलब्ध होण्यासाठी, रुग्णालयात उपचारासाठी खाटा उपलब्ध होण्यासाठी, आरोग्य विषयक मदत मिळण्याकरिता संपर्क साधण्यासाठी, सर्व अधिकाऱ्यांचे तातडीने लसीकरण करण्यासाठी महावितरणच्या भांडुप परिमंडळात कोविड-१९ समन्वय कक्षांची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती महावितरण भांडुप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी दिली.
महाराष्ट्रात नव्याने वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सर्व खासगी कार्यालयांना ‘वर्क फ्रॉम होम’ आहे. तसेच शैक्षणिक संस्था मागच्या वर्षांपासूनच ऑनलाईन शिकवणी घेत आहेत. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक जणांना घरातच होम क्वारंटाईन केले जात आहे. लॉकडाऊनमुळे लोक घरातच असून या सर्व बाबी लक्षात घेता त्यांना उत्तम व अखंडित सेवा देण्याचा उद्देशाने आपल्या जीवाची पर्वा न करता महावितरणचे प्रकाशदूत अहोरात्र काम करत आहेत. या परिस्थितीत त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच त्यांना आवश्यक माहिती देण्यासाठी आयोजित सर्व संघटना पदाधिकारी यांच्या बैठकीत सुरेश गणेशकर बोलत होते. जगासह देशात तसेच राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात स्थिती गंभीर झाली असून चिंता वाढू लागली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन जाहीर केला असून अशा परिस्थितीत महावितरणचे अधिकारी व कर्मचारी ग्राहकांना उत्तम सेवा देण्याकरिता दिवसरात्र मेहनत करत आहेत. आजच्या घडीला अखंडित वीजपुरवठा करणे अत्यंत गरजेचे असून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोरोनापासून स्वतःला सुरक्षित ठेवून ग्राहकांना उत्तम सेवा देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
......................................