२४ वॉर्डात ९५ विशेष पथकांची स्थापना, कोर्टाच्या दणक्यानंतर पालिकेची पळापळ
By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2023 11:42 AM2023-11-08T11:42:07+5:302023-11-08T12:00:25+5:30
२४ वॉर्डात आतापर्यंत ९५ विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ही पथके संबंधित वॉर्डातील बांधकामावर लक्ष ठेवून आहेत.
मुंबई : मुंबईतील वायुप्रदूषणाची अत्यंत गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी पालिकेला कठोर निर्देश दिले. त्यानंतर पालिका प्रशासनाची चांगलीच धावपळ सुरू झाली आहे. पालिकेच्या सर्व २४ प्रशासकीय विभागांतर्गत येणाऱ्या बांधकाम ठिकाणांची पाहणी करण्यासाठी विशेष पथके स्थापन करावीत अशा सूचना देण्यात आल्या होत्या. २४ वॉर्डात आतापर्यंत ९५ विशेष पथके स्थापन करण्यात आली असून, ही पथके संबंधित वॉर्डातील बांधकामावर लक्ष ठेवून आहेत.
बांधकामांच्या बाबतीत आजच्या निर्देशांनंतरही हवेची गुणवत्ता सुधारली नसल्याचे आढळल्यास काही कालावधीसाठी मुंबईतील बांधकामे व पायाभूत सुविधा प्रकल्पांतील बांधकामाची कामे थांबवण्याचे निर्देश द्यावे लागतील, असा इशारा मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यामुळे पालिका प्रशासन ॲक्शन मोडवर आले आहे. या आधी प्रदूषणाची खालावलेली पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक विभागात किमान ५० पथकांची नियुक्ती करता येईल, असे पालिकेने निर्देशित केले आहे.
नियोजन विभागाकडून इशारा
शहरात सहा हजारांहून अधिक बांधकामे सुरू असून, या सगळ्यांना बांधकामाच्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचनावजा इशारा पालिकेच्या नियोजन विभागाकडून देण्यात आला आहे. धूळ प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्यास वॉर्ड स्तरावरील विशेष पथकाकडून होणाऱ्या कारवाईसंदर्भात त्यांना कल्पना देण्यात आली आहे. दरम्यान, वॉर्ड स्तरावरील विशेष पथकांकडून मंगळवारपर्यंत ९४१ बांधकामांना इशारा (इन्टिमेशन) देण्यात आपले आहे.