मुंबई - महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या परिसरात निर्माण होणाऱ्या विविध आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी महामंडळस्तरावर आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. याबाबतचे कार्यालयीन आदेश व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे पाटील यांनी दिले आहेत. हा कक्ष दिवसाचे २४ तास, वर्षाचे ३६५ दिवस कार्यान्वित राहणार असून, आपत्ती निर्माण झाल्यास तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजनाकरीता सहाय्यभूत ठरणार आहे.
दादासाहेब फाळके चित्रनगरी ५२१ एकर जागेवर वसलेली असून, या परिसरात दररोज निर्माते, कलावंत, तंत्रज्ञ आणि पर्यटकांची वर्दळ असते. या ठिकाणी विविध मराठी, हिंदी मालिकांचे भव्य सेट उभारण्यात आलेले आहेत. अनेक बाह्यचित्रीकरण स्थळी दिवसरात्र चित्रीकरण सुरु असते. त्यामुळे अशा ठिकाणी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास तात्काळ आपत्ती निवारण्यासाठी आपत्ती कक्षाची मोठी मदत होणार आहे. या कक्षात सुरक्षा विभागाच्या जवानांसह महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाचाही समावेश असणार आहे. ८ जूनपासून आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यान्वित होणार असून, महामंडळ परिसरात कार्यरत असणाऱ्या निर्मितीसंस्थांनी आपत्ती निर्माण झाल्यास आपत्ती कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन महामंडळ प्रशासनाने केले आहे.