मुंबई: दमण येथील मच्छिमार सहकारी संस्थेमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दमण आणि दीऊ या तीन राज्यातील मच्छिमार संघटनेचे संयुक्त सभा पार पडली. या सभेत पश्चिम किनारट्टीवरील मच्छिमारांना भेडसावणाऱ्या प्रश्न आणि समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे पालघर जिल्हाध्यक्ष विनोद पाटील यांनी लोकमतला दिली.
सभेमध्ये अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली ज्यामध्ये पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी ६१ दिवसांवरुन ९० दिवस करणे, तिन्ही राज्यांच्या उद्योजिक क्षेत्रांमध्ये कार्यरत रासायनिक कंपन्यांमुळे तिन्ही राज्यातील खाड्या मृत अवस्थेत झाले असून ह्या खड्यांना पुन्ह जिवंत करणे, तिन्ही राज्यातील मच्छीमारांचे अंतर्गत वाद सलोख्याने आणि सामंजस्याने सोडविणे, बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारी, एल.ई.डी लाईट मासेमारी, लाईन फिशिंग ह्यांच्यावर कठोर कारवाई करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून कठोर कायदे निर्माण करणे, अवैध मासेमारी करणाऱ्या मच्छिमारांवर भारतीय दंड साहित्य अंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी आयपीसी कलमांमध्ये सुधारणा करणे, वाढवण बंदर आणि दमण येथील रेती उत्खनन मुळे मासळी साठ्यावर दुष्परिणाम होणं असल्यामुळे अश्या प्रकल्पांना संयुक्तरित्त्या विरोध करून मासेमारीला असणाऱ्या घातक प्रकल्पांना हाणून पाडणे आदी समस्यांवर तोडगा काढण्यासाठी आणि राज्य तथा केंद्र सरकारांवर दबावगट निर्माण करून मच्छिमारांच्या प्रश्नांचे मार्गी लावण्याकरिता पश्चिम किनारपट्टीलगत च्या राज्यांनी संयुक्त फेडरेशन ची स्थापना केली असल्याची माहिती पाटील यांनी दिली.
दमण येथे पार पडलेल्या मच्छिमारांच्या संयुक्त बैठकीत गुजरात राज्यातून पोरबंदर, ओखा, वेरावल, जाफराबाद, नार्गोल, दमण, दिऊ, तसेच महाराष्ट्र राज्यातून पालघर, ठाणे, मुंबई आदी प्रांतातून प्रमुख मच्छिमार समित्यांनी उपस्थिती दर्शविली. या सभेत एकमताने ठराव पारित करत मच्छिमारांच्या न्याय हक्कासाठी पश्चिम किनारपट्टीवरील राज्याची इंडियन वेस्ट कोस्ट फिशरमेन्स फेडेरेशन ( डब्ल्यूसीएफएफ ) या संस्थेची स्थापना करण्यात आली असल्याचे पाटील यांनी सांगितले. तत्वतः मच्छिमारांचे प्रश्न केंद्र सरकार पर्यंत संयुक्त रित्या पोहचविण्याकरिता तीन राज्यातील मच्छिमारांची कोअर कमिटी स्थापन करण्यात आली असून जानेवारी महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांना फेडरेशनचे शिष्टमंडळ भेट देणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
सदर बैठकीत ठराव पारित करून कोअर कमिटी मध्ये महाराष्ट्र राज्यातून बर्नार्ड डिमेलो (ठाणे), विनोद पाटील (पालघर), देवेंद्र तांडेल (मुंबई), जी.एस. पाटील (नवी मुंबई), संजय कोळी (वसई), मनीष वैती (रायगड), खलील वत्सा (रत्नागिरी), मिथुन मालंडकर (सिंधुदुर्ग), कुंदन दवणे (डहाणू) ह्यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच नयना पाटील, अश्विनी तरे, सुफल्ला तरे आणि रुपाली पाटील ह्यांची सुद्धा नियुक्ती महाराष्ट्र राज्यातून करण्यात आली आहे. गुजरात राज्यातून कान्हयालाल सोलंकी, भगुभाय सोलंकी, पवन सियाल, मुकेश पांजरी, कीर्तीभाय घोयल, दिनेशभाय, सुनीलभाय घोयल, कीर्ती तांडेल, वासू तांडेल यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच दमण आणि दिऊ राज्यातून गोपाळ तांडेल, उदयभाय तांडेल, उमेश बामानिया, डॉ. भावेश सोलंकी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सदर फेडरेशन लवकरच गोवा आणि कर्नाटक येथील मच्छिमारांची संयुक्त सभा घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.