Join us

मराठी माणूस एकजूट राहावा यासाठी शिवसेनेची स्थापना – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 10:53 PM

आनंदीबाई नी ध चा मा केला आणि इतिहास घडला. आज माञ काही महाभागांनी देश सेवा विसरून केवळ लाटण्याचा प्रयत्न केला आहे असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई - मराठी माणूस एकत्र एकजुटीने राहिला पाहिजे यासाठी शिवसेनेची स्थापना झाली आहे. हे काम सुभाष देसाईंसारख्या शिवसैनिकांनी केलं आहे. आजपर्यंत जी जी जबाबदारी सुभाष देसाई यांच्यावर दिली ती त्यांनी पार पाडली आहे. आजपर्यंत स्वत:साठी त्यांनी काहीही मागितलं नाही. ना त्यांनी बाळासाहेबांकडे काही मागितलं अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी(Uddhav Thackeray) देसाईंचं कौतुक केले आहे.

प्रबोधन गोरेगाव या संस्थेला ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल उद्धव ठाकरे म्हणाले की, संस्थेने ५० वर्षे असं कधीही झालं नाही की मी या कार्यक्रमात सहभागी झालो नाही. नुकताच एका अनुभवातून बाहेर पडलो आहे. त्यामुळे प्रत्यक्षात येऊ शकलो नाही. सध्या हळूहळू मी पाऊलं टाकत आहे. एखादी संस्था उभी करणं सोप्प आहे परंतु ती सत्याने चालवत ठेवणे हे मोठं आव्हान असतं. आता या संस्थेने हाफ सेंच्युरी केली आहे. लवकरच सेंच्युरी देखील करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तसेच आपण या देशाचं देणे लागतो असं सावरकर म्हणायचे. यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. आनंदीबाई नी ध चा मा केला आणि इतिहास घडला. आज माञ काही महाभागांनी देश सेवा विसरून केवळ लाटण्याचा प्रयत्न केला आहे अशा शब्दात त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपावर निशाणा साधला.

प्रबोधनकारांनी सामाजिक वाटचालीत वेगळी भूमिका मांडली

या कार्यक्रमात शरद पवारही(Sharad Pawar) उपस्थित होते. ते म्हणाले की, प्रबोधकार ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या सामाजिक वाटचालीत त्यांनी एक वेगळी भूमिका मांडली. समाजातील वाईट प्रवृत्तीच्या विरोधात त्यांनी आपली लेखणी चालवली. फुले,शाहू,आंबेडकर यांच्या विचारांचे ते पुरस्कर्ते होते. प्रबोधनकारांचा आदर्श ठेवून आणि त्यांच्या नावाचा उल्लेख असलेली प्रबोधन गोरेगाव या संस्थेने महाराष्ट्राच्या सामाजिक क्षेत्रांत आपला ठसा उमटवला आहे असे गौरवोद्गार त्यांनी काढले. तसेच मुख्यमंत्री म्हणून राज्याचा प्रमुख असतांना अनेक क्रीडा संघटनांशी घनिष्ठ संबध आला. कब्बडी,खोखो या खेळांचे क्रीडामहर्षी शंकारबुवा साळवी यांच्याकडून प्रबोधन गोरेगावच्या कार्याची माहिती मिळत असे. ५० वर्षांपूर्वी छोटेसे रोपटे लावलेल्या आणि गोरेगावकरांशी समरस असलेल्या प्रबोधन गोरेगाव या एका चांगल्या संस्थेचा आज वटवृक्ष झाला आहे असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज गोरेगावात काढले.

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेसुभाष देसाई