मुंबईत आवश्यकतेनुसार सुविधा समुदाय केंद्राची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:07 AM2021-09-25T04:07:02+5:302021-09-25T04:07:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : गरजू नागरिकांसाठी सुविधा समुदाय केंद्रांची निर्मिती घाटकोपर येथे करण्यात आली आहे. येथे स्वच्छ ...

Establishment of Suvidha Community Center as required in Mumbai | मुंबईत आवश्यकतेनुसार सुविधा समुदाय केंद्राची निर्मिती

मुंबईत आवश्यकतेनुसार सुविधा समुदाय केंद्राची निर्मिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : गरजू नागरिकांसाठी सुविधा समुदाय केंद्रांची निर्मिती घाटकोपर येथे करण्यात आली आहे. येथे स्वच्छ शौचालय, स्नानगृह, पिण्याचे शुद्ध पाणी, यांत्रिकी कपडे धुलाई या सोयी उपलब्ध आहेत. असे केंद्र मुंबई महानगरात आवश्यक त्या भागांमध्ये उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. धारावीत १११ शौचकूप असलेले सुविधा केंद्राचे काम सुरू असल्याची माहिती राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुक्रवारी दिली.

घाटकोपर (पश्चिम)मधील जगदुशानगर येथे सार्वजनिक-खासगी सहभागातून निर्मित, पर्यावरणस्नेही दुमजली सुविधा समुदाय केंद्र उभारण्यात आले आहे. आदित्य ठाकरे यांच्या हस्ते या केंद्राचे लोकार्पण करण्यात आले. महापालिकेसह हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनी, हाँगकाँग आणि शांघाय बँकिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एचएसबीसी इंडिया) यांच्या संयुक्त भागीदारीतून सुविधा केंद्र प्रकल्प साकारला आहे.

मुंबईत अशी सहा केंद्रे...

मुंबईमध्ये एकूण सहा सुविधा समुदाय केंद्रे उभारण्याचा संयुक्त प्रकल्प हाती घेण्यात आला. घाटकोपर (पश्चिम)मधील आझादनगरामध्ये २०१६ रोजी पहिल्या सुविधा केंद्राचे लोकार्पण झाले. त्यानंतर मालाड-मालवणी, अंधेरी, गोवंडी आणि कुर्ला येथे सुविधा केंद्र कार्यान्वित झाले. धारावीमध्ये अतिरिक्त केंद्र बांधण्यात येत आहे.

अशा आहेत सुविधा....

गरजू लोकांना स्वच्छ, सुरक्षित व दुर्गंधीमुक्त प्रसाधनगृह उपलब्ध व्हावे. त्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे या दृष्टिकोनातून सुविधा केंद्रांची निर्मिती करण्यात येत आहे. यापूर्वीच्या पाच सुविधा केंद्रांच्या माध्यमातून आतापर्यंत ३५ दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्यात आली. प्रत्येक केंद्रामध्ये वार्षिक २० हजार याप्रमाणे पाच केंद्रांमध्ये मिळून एक लाख नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला.

पाण्यावर पुन:प्रक्रिया करणारे पहिले शौचालय...

घाटकोपर येथील या शौचालयातील पाण्यावर पुन:प्रक्रिया करून तिथेच पुनर्वापरासाठी उपलब्ध करून देणारे हे मुंबईतील पहिलेच केंद्र आहे. या केंद्रामध्ये ३८ शौचकूप आहेत. पिण्याचे पाणी, स्नानगृह, प्रसाधनगृह तसेच कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन या सर्व सुविधा एका छताखाली उपलब्ध आहेत. वर्षभरामध्ये १० दशलक्ष लीटर पाण्याची बचत करण्यासाठी या केंद्रातच पाण्यावर पुन:प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यात येणार आहे.

Web Title: Establishment of Suvidha Community Center as required in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.