मुंबई : राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लोकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि सौम्य लक्षणे असलेले व ज्यांच्यात लक्षणे दिसून आली नाहीत असे कोरोनाबाधित रुग्ण यांच्यावर उपचार करण्यासाठी आयुष मंत्रालयांतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा सारख्या पद्धतीचा अवलंब करण्याचे योजिले आहे. याकरिता आयुष्य संचलनायमार्फत विशेष टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली असल्याचे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागामार्फत जाहीर करण्यात आले आहे. ९ जणांच्या या टास्कफोर्समध्ये वैद्यकीय शिक्षण संचलनालयाचे संचालक डॉ तात्याराव लहाने हे अध्यक्षस्थानी असणार आहेत.या आधी आयुष अंतर्गत असलेल्या आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योगचिकित्सा पद्धतींचा अवलंब गुजरात, पंजाब , मध्यप्रदेश, केरळ , गोवा सारख्या राज्यांत यशस्वीरीत्या करण्यात आला आहे. यासंदर्भात केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाकडून देखील वेळोवेळी सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन महाराष्ट्र राज्यातही आयुष्य अंतर्गत असलेल्या उपरोक्त पद्धतींचा वापर करण्यात यावा अशी मागणी होत होती. त्या पार्श्वभूमीवर आयुष संचालनालय , महाराष्ट्र यांकडून शासनाला यासंदर्भात प्रस्ताव ही सादर करण्यात आला होता. याचमुळे या टास्कफोर्सची स्थापना करण्यात आली आहे. डॉ तात्याराव लहाने यांच्याशिवाय आयुष संचलनालयाचे संचालक डॉ कुलदीप राज कोहली या टास्कफोर्सचे सहअध्यक्ष तर सहाय्य्क संचालक डॉ सुभाष घोलप सचिव म्हणून काम पाहणार आहेत.मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉ शुभा राऊळ ,जेष्ठ होमिओपॅथी तज्ज्ञ डॉ जसवंत पाटील, डॉ जवाहर शाह , डॉ हरीश बी सिंह , डॉ उदय कुलकर्णी, डॉ संजय तामोळी आदी तज्ज्ञांचा सदस्य म्हणून सहभाग असणार आहे.