मुंबई : राज्यात तिवरांच्या संरक्षणासाठी प्रतिष्ठान स्थापन करण्याचा महत्वपूर्ण निर्णय वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला आहे. कांदळवन संवर्धनाच्या अधिक परिणामकारक प्रयत्नांसाठी व किनाऱ्यावरील जनतेच्या जीवनमानात सकारात्मक प्रभाव आणण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्वपूर्ण ठरणार आहे. राज्याच्या सुमारे ७२० किमी किनारपट्टीवर सुमारे २९८३९ हेक्टर क्षेत्र कांदळवन क्षेत्र आहे. त्यापैकी सरकारी जमिनीवरील सुमारे १६५५४ हेक्टर क्षेत्र खाजगी जमिनीवरील सुमारे १३२८५ हेक्टर कांदळवन क्षेत्र आहे. राज्य वन्यजीव मंडळाने दिलेल्या निदेर्शाप्रमाणे नवी मुंबई विमानतळाच्या मूल्याच्या ३ टक्के म्हणजेच रु ११५.७१ कोटी रक्कम कांदळवनाच्या संवर्धनासाठी वन विभागाकडे जमा केली आहे. तिवरांच्या संरक्षणासाठी स्थापन करण्यात येणाऱ्या २३ सदस्यीय या प्रतिष्ठानाचे पालक मुख्यमंत्री असून वन मंत्री हे अध्यक्ष असतील. तसेच मुख्य वन संरक्षक कांदळवन कक्ष, मुंबई हे प्रतिष्ठानाचे सदस्य सचिव असतील. सदर समितीचे काम जलद गतीने होण्यासाठी ९ सदस्यीय कार्यकारी समिती देखील गठीत करण्यात आली आहे.सदर निधी तीवर संवर्धन प्रतिष्ठान याचा आधार म्हणून जमा केल्यास त्याच्या व्याजातून प्रतिष्ठानाचे कामकाज वषार्नुवर्ष चालू राहील व शासनावर कोणत्याही प्रकारचा आर्थिक भार पडणार नाही तसेच या करिता नवीन पद निर्माण करण्यात येणार नाही. इतर प्रकल्पाकरिता कांदळवनाच्या जमिनीचे वळती कारण झाल्यास त्या ऐवजी प्राप्त होणारी रक्कम देखील प्रतीष्ठानाकडे जमा होईल. तसेच तीवर संवर्धन प्रतिष्ठान तिवरांचे संवर्धन सागरी जीव विविधता त्यावर आधारित उपजीविकांची साधने, रोजगार, पर्यटन इत्यादी क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावेल. (विशेष प्रतिनिधी)
तिवर संरक्षणासाठी प्रतिष्ठान
By admin | Published: September 25, 2015 3:08 AM