अदानीच्या वाढीव वीज बिलांच्या तपासणीसाठी दोन सदस्यीय समितीची स्थापना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 05:15 AM2018-12-08T05:15:46+5:302018-12-08T05:15:58+5:30
वीज बिलांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मुंबई : अदानी इलेक्ट्रिसिटीकडून वीज ग्राहकांना नियमित दरापेक्षा वाढीव दराने प्राप्त झालेल्या वीज बिलांच्या अनुषंगाने तपासणी आणि उपाययोजनांबाबत शिफारस करण्यासाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे अध्यक्ष आनंद कुलकर्णी यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
समितीमध्ये माहिती आयुक्त अजित जैन आणि तांत्रिक विषयातील तज्ज्ञ विजय सोनवणे यांचा समावेश आहे. ही समिती अदानीबरोबरच बेस्ट, टाटा पॉवर, महावितरण अशा अन्य वीज वितरण परवानाधारकांकडून मुंबई आणि मुंबई उपनगरातील या कालावधीत देण्यात आलेल्या देयकांचाही तुलनात्मक अभ्यास करेल.
समितीने पुढील दोन ते तीन महिन्यांत आयोगाला आपला अहवाल देणे अपेक्षित आहे. दरम्यान, मुंबई उपनगरातील अदानीच्या ग्राहकांना नोव्हेंबरमध्ये नियमित दरापेक्षा वाढीव दराने वीज बिले प्राप्त झाली आहेत. त्याबाबत आयोगाने अदानीकडून स्पष्टीकरण मागविले होते.
अदानी कंपनीच्या २७ लाख ग्राहकांपैकी जवळपास १ लाख १० हजार निवासी ग्राहकांना सुमारे २० टक्के वाढीव दराची वीज देयके प्राप्त झाली आहेत.