मैत्रिणीच्या बर्थ डेसाठी बाहेर गेलेल्या तरुणीवर बलात्कार, तपासासाठी दोन पथके केली स्थापन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2019 01:50 AM2019-08-03T01:50:50+5:302019-08-03T01:50:52+5:30
मुंबईतील सामूहिक बलात्कार प्रकरणाच्या चौकशीसाठी
मुंबई : मैत्रिणीच्या वाढदिवसानिमित्त घराबाहेर पडलेल्या १९ वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार प्रकाराने मुंबई हादरली. औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यातून शुक्रवारी हे प्रकरण मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. त्यानुसार, शुक्रवारी चुनाभट्टी पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करीत, तपास सुरू केला आहे.
मूळची जालनाची रहिवासी असलेली तरुणी दोन महिन्यांपासून मुंबईत भावाकडे राहायला आली होती. ७ जुलै रोजी चेंबूरच्या लाल डोंगर परिसरातच मैत्रिणीच्या वाढदिवसाला जाण्यासाठी ती बाहेर पडली असता तिच्यावर चौघांनी सामूहिक बलात्कार केला. त्यानंतर प्रकृती खालावल्याने काही दिवसांत ती वडिलांसोबत औरंगाबादला निघून गेली. तिथे ३० जुलै रोजी तिची वैद्यकीय तपासणी केली असता हे प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर, औरंगाबाद येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तेथून तो मुंबई पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. शुक्रवारी या प्रकरणाची कागदपत्रे चुनाभट्टी पोलिसांना मिळाली. त्यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत, वरिष्ठ निरीक्षकाच्या नेतृत्वाखाली दोन पथकांची नेमणूक करण्यात आली असून त्यांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्हींद्वारे शोध सुरू आहे; शिवाय स्थानिक खबरी, दुकानदारांकडे पोलीस अधिक तपास करीत आहेत. स्थानिकांपैकी कुणाचा यात समावेश आहे का? या दिशेनेही तपास सुरू असून काही संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडेही पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.