मुंबई : सोलापूर विद्यापीठातील २५२ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना नैतिक मूल्यांचे धडे देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या संवेदनशील वयात संस्कार आणि शिक्षण देण्यासाठी मुंबईच्या हेमा फाऊंडेशनने हा अभिनव प्रयोग हाती घेतला आहे. त्यासाठी विद्यापीठाने कौशल्य विकास योजना कार्यक्रमाअंतर्गत या मूल्य शिक्षण प्रमाणपत्र अभ्यासक्रमास मान्यता दिली आहे. १ आॅगस्टपासून या उपक्रमाची सुरूवात झाली आहे.हेमा फाऊंडेशनचे विश्वस्त महेंद्र काबरा यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये आई-वडील, समाज आणि राष्ट्राप्रती नैतिक जबाबदारीची जाणीव करून देत, त्यांना जागरुक व उत्तरदायी नागरिक बनवण्याचा प्रयत्न या अभ्यासक्रमातून होणार आहे. शाळा आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी भौतिक शिक्षणासोबत नैतिक शिक्षणाची नितांत गरज आहे. नैतिक शिक्षणानेच सर्वांगीण विकास संभव आहे. शैक्षणिक जीवनातच विदयार्थ्यांना नैतिक मूल्ये जोपासण्यासाठी प्रेरणा देण्याची आज नितांत आवश्यकता आहे. ह्याच कारणामुळे हेमा फाऊंडेशनच्या ह्या पाठ्यक्रमास सोलापूर विद्यापीठाने मान्यता दिली आहे.ह्या प्रमाणपत्र अभ्यासक्रमात जीवन मूल्यांवर निर्मित ३२ लघुपट आणि त्यावर आधारित उपक्रम व वर्तन शास्त्राचा समावेश केला आहे. ह्या अभ्यासक्रमाची रचना संगीता जाधव ह्यांनी केली आहे. तसेच प्रात्यक्षिक अभ्यासक्रम हा ९६ तासिकांमध्ये विभाजित करून ६ महिन्यांत आठवड्यातून दोन दिवस, दोन तास अशा प्रकारे घेतला जाईल. हा अभ्यासक्रम शाळा आणि महाविद्यालयांना मोफत दिला जात आहे. फक्त लघुपट दाखवून थांबता येणार नसल्याने फाऊंडेशनने ह्यहेम दिशाह्ण या शिक्षक मार्गदर्शिकेचा समावेश या अभ्यासक्रमात केला आहे. ह्या मार्गदर्शिकेत सुविचार, संस्कृत श्लोक, संवाद, प्रेरणादायी नाटिका, कविता, प्रेरणादायी कथा, चित्रकला, खेळता-खेळता शिकणे आणि कोडी सोडवणे इत्यादी उपक्रम समाविष्ट आहेत. हे अतिशय मनोरंजक आणि सोप्या भाषेत लिहिले गेले आहेत. त्यामुळे उत्साहपूर्वक शिक्षणाची भावना मुलांमध्ये जागृत होईल आणि उत्साहाने मुले सहजपणे शिकू शकतात, असा दावा फाऊंडेशनने केला आहे..........................इतर भाषांतही शिकता येणार!ही पद्धत मुलांच्या अंत:करण व मनात विशिष्ट मूल्ये रुजविण्याची प्रभावी प्रणाली म्हणून सिद्ध होत असल्याचा दावा फाऊंडेशनने केला आहे. म्हणूनच समाजातील सर्व वर्गातील मुलांचे नैतिक शिक्षण व सर्वांगीण विकास व्हावा म्हणून ह्या लघुपटांचे इंग्रजी, तेलगू, मराठी इत्यादी प्रादेशिक भाषांमध्ये डबिंग केल्याचेही फाऊंडेशनने सांगितले.
सोलापूरच्या 252 महाविद्यालयांत नैतिक मूल्यांचे धडे, मुंबईच्या हेमा फाऊंडेशनचा उपक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2018 7:32 PM