पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे
By admin | Published: July 21, 2014 01:28 AM2014-07-21T01:28:22+5:302014-07-21T01:28:22+5:30
मुंबई विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अमेरिकन पत्रकार जेन लिच यांनी गुरुवारी पत्रकारितेतील नैतिकतेवर व्याख्यान दिले
मुंबई : मुंबई विद्यापीठातील पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांना अमेरिकन पत्रकार जेन लिच यांनी गुरुवारी पत्रकारितेतील नैतिकतेवर व्याख्यान दिले. हा कार्यक्रम अमेरिकन कौन्सुलेट जनरल अणि मुंबई विद्यापीठ पत्रकारिता आणि जनसंज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. सुंदर राजदीप व थिंक टँक या विद्यार्थी संघटनेच्या पुढाकाराने झाला. जेन लिच यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून त्यांच्या दृष्टीने पत्रकारिता म्हणजे काय, एखाद्या घटनेकडे ते कसे बघतात, याबद्दल जाणून घेतले. त्यानंंतर भारतात होणाऱ्या स्त्रियांवरील अत्याचारांबाबत बातमी देताना तुम्ही काय काळजी घेता, काय काळजी घ्यायला हवी, याबाबत
काही उदाहरणे देऊन माध्यमांतील नैतिकतेबाबत आपले विचार मांडले.
या कार्यक्रमात थिंक टँक या विद्यार्थी संघटनेचा संस्थापक अमृतांश निगम, ओमकार पाटकर, शौमिक चौधरी आणि वैशाली सातर्डेकर यांनी प्रश्न विचारत पत्रकारितेबाबत त्यांचा दृष्टिकोन व्यक्त केला. जेन लिच यांनी विद्यार्थ्यांना नैतिकतेचे धडे देताना पर्सनल एथिक्स, प्रोफेशनल एथिक्स आणि आॅर्गनायझेशनल एथिक्स यांची सांगड घालत बातमीला कसा न्याय द्यावा, पीडितांशी बोलताना कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन केले.
यासंदर्भात आपले मत व्यक्त करताना अमृतांश निगम या विद्यार्थ्याने असे म्हटले की, भारतीय प्रसारमाध्यमे आणि जागतिक दर्जाची प्रसारमाध्यमे यांच्यातील फरक आम्हाला कळला. तसेच शौमिक चौधरी याने सांगितले की, बातमी करताना कोणते निकष पाळले जावेत, हे समजले. ओमकार पाटकर म्हणाला, भरतीय पत्रकारिता आणि आंतरराष्ट्रीय पत्रकारिता यांच्यातील मूलभूत फरक, घटनेचे अधिकार याबद्दल आम्हाला माहिती
मिळाली. (प्रतिनिधी)