राज्यातील 1 लाख सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार ईटीपीबीएस मतपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 03:33 PM2019-03-24T15:33:43+5:302019-03-24T15:37:19+5:30

राज्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.

ETPBS ballot box has reached 1 lakh service voters in the state | राज्यातील 1 लाख सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार ईटीपीबीएस मतपत्रिका

राज्यातील 1 लाख सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचणार ईटीपीबीएस मतपत्रिका

googlenewsNext
ठळक मुद्देराज्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने इटीपीबीएस यंत्रणा विकसित केली आहे.मतदानाच्या साधारणतः 10 दिवसांपूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात.

मुंबई - लष्करी, केंद्रीय आणि राज्य सशस्त्र पोलीस दलातील जवान (सर्व्हिस वोटर्स) तसेच प्रशिक्षणासाठी किंवा  शासकीय सेवेनिमित्त प्रतिनियुक्तीवर परदेशात असलेल्या भारतीय अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी भारत निवडणूक आयोगाने यंदाच्या निवडणुकीत इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट सिस्टीम (ईटीपीबीएस) उपलब्ध करून दिली आहे. राज्यात आतापर्यंत 1 लाख 8 हजारहून अधिक सर्व्हिस वोटर्सची नोंद झाली असून त्यांच्यापर्यंत इलेक्ट्रॉनिकरित्या मतपत्रिका पोहोचवल्या जाणार आहेत.

भारत निवडणूक आयोगाने सी-डॅकच्या साहाय्याने इटीपीबीएस यंत्रणा विकसित केली आहे. 2016 मध्ये पुद्दुचेरी विधानसभेच्या नेल्लीथोप मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत पहिल्यांदा इटीपीबीएसचा वापर करण्यात आला. या यंत्रणेच्या माध्यमातून मतपत्रिका ऑनलाइनरित्या सर्व्हिस वोटर्सपर्यंत पोहोचवल्या जातात. लष्करी दले अथवा अन्य सर्विस वोटर्स असलेल्या सेवांमधील नोडल अधिकारी सर्व्हिस वोटर्सचे इटीपीबीएससाठीचे अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे (डीईओ) पाठवितात. डीईओंनी जिल्ह्यातील सर्व्हिस वोटर्सची यादी संबंधित मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे (इआरओ) पाठविल्यानंतर इआरओ या अर्जावर निर्णय घेतात. 

मतदानाच्या साधारणतः 10 दिवसांपूर्वी सर्व्हिस वोटर्सना इटीपीबी यंत्रणेद्वारे ऑनलाइन पद्धतीने मतपत्रिका पाठविल्या जातात. मतपत्रिकांचा पारंपरिक पद्धतीने पोस्टाद्वारे होणारा मतदारांपर्यंतचा एका बाजूचा प्रवास वाचण्यासह निवडणूक प्रशासनावरील बराचसा ताण कमी होतो. या मतपत्रिका डाऊनलोड आणि प्रिंट काढून मतपत्रिकेवर आपले मत नोंदविल्यानंतर विहित पद्धतीने पोस्टाने पाठविणे आवश्यक असते. पोस्टल मते पाठविण्यासाठी कोणतेही टपाल तिकीट लावण्याची आवश्यकता नसते. 

पात्र कोण?

- सेवेनिमित्त आपल्या मतदारसंघाच्या बाहेर असलेले लष्करी, निमलष्करी दलातील जवान

- केंद्रीय सशस्त्र पोलीस बलांमधील जवान.

- निवडणूक कालावधीत राज्याबाहेर कर्तव्यावर असलेले राज्य शासनाच्या सशस्त्र पोलीस बलांमधील जवान 

- जवानांबरोबर निवास करत असलेल्या त्यांच्या पत्नी

- परदेशात शासकीय सेवा बजावत असलेले भारतीय शासकीय सेवेतील अधिकारी- कर्मचारी (ओव्हरसीज वोटर्स)

वैशिष्ट्ये

- ईटीपीबीएस यंत्रणेला द्विस्तरीय सुरक्षितता लाभलेली आहे.

- इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलट डाउनलोड करण्यासाठी ओटीपी आणि पिन नंबर आवश्यक. 

- युनिक क्यूआर कोडमुळे पोस्टल मतपत्रिकेची सुरक्षितता राखली जाण्यासह नक्कल (डुप्लिकेशन) होऊ शकणार नाही.

यावर्षी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात 1 लाख 4 हजार 435 इतक्या सर्व्हिस वोटर्सची संख्या असून त्यात आतापर्यंत सुमारे 4 हजारांची भर पडली आहे. सर्व्हिस वोटर्स नोंदणीची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. अंतिम मतदार यादीनुसार 1 लाख 2 हजार 617 पुरुष तर 1 हजार 818 महिला सर्व्हिस वोटर्स आहेत. सर्वाधिक सर्व्हिस वोटर्स सातारा लोकसभा मतदार संघात असून सर्वात कमी मुंबई उत्तर मतदार संघात आहेत. 

अंतिम मतदार यादीनुसार मतदारसंघनिहाय सर्व्हिस वोटर्सची संख्या 

नागपूर – 806, भंडारा-गोंदिया – 2 हजार 612, गडचिरोली-चिमूर 1 हजार 239, चंद्रूपर -1 हजार 556, यवतमाळ-वाशिम 1 हजार 319, वर्धा 1 हजार 325, रामटेक – 1 हजार 584, हिंगोली – 1 हजार 131, नांदेड –1 हजार 422, परभणी – 1 हजार 259, बीड-4 हजार 8, उस्मानाबाद -3 हजार 321, लातूर 2 हजार 975, सोलापूर – 1 हजार 591, बुलढाणा -3 हजार 823, अकोला -3 हजार 266, अमरावती -2 हजार 435, जालना -2 हजार 5, औरंगाबाद- 1 हजार 290, जळगाव – 5 हजार 640, रायगड -1 हजार 330, पुणे 696, बारामती 2 हजार 93, अहमदनगर 6 हजार 683, रावेर-1 हजार 812, माढा-4 हजार 354, सांगली 5 हजार 692, सातारा-8 हजार 701, रत्नागिरी-सिंधुदुर्ग 980, कोल्हापूर- 5 हजार 738, हातकणंगले-3 हजार 709, नंदुरबार - 902, धुळे-  3 हजार 57, दिंडोरी-3 हजार 851, नाशिक – 2 हजार 638, पालघर- 274, भिवंडी -285, कल्याण-471, ठाणे-534, मुंबई उत्तर -117, मुंबई वायव्य- 147, मुंबई ईशान्य -317, मुंबई उत्तर मध्य-133, मुंबई दक्षिण मध्य -192, मुंबई दक्षिण-220, मावळ-597, शिरुर- 1 हजार 818 आणि शिर्डी-2 हजार 487.
 

Web Title: ETPBS ballot box has reached 1 lakh service voters in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.