मुंबई : आगीच्या दुर्घटना अथवा मुंबईवर ओढवणाऱ्या कोणत्याही नैसर्गिक आपत्ती काळात अग्निशमन दलाचे जवान मदतकार्यासाठी सदैव तत्पर असतात. जवानांच्या सुरक्षेसाठी वैयक्तिक स्तरावर अधिक संरक्षित गणवेश पुरविण्याचे निर्णय पालिका प्रशासनाने घेतले आहेत. त्यानुसार पाश्चात्त्य, विशेषत: युरोपियन दर्जा असलेला गणवेश घेतला जाणार आहे. या गणवेशामुळे आग विझवताना जवान सुरक्षित राहतील, असा पालिकेचा विश्वास आहे. मुंबई अग्निशमन दलातील जवानांसाठी महापालिकेने २०१७ मध्ये अत्याधुनिक गणवेश घेतले होते. या गणवेशाची मुदत संपणार असल्याने पालिकेकडून नवीन गणवेश खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठी १६ कोटी १९ लाख रुपयांचा निधी लागणार आहे. या नव्या गणवेशामुळे आग विझवताना संपूर्ण शरीर झाकले जाणार असून, आग विझवताना कमी इजा होणार आहे.
nपालिकेकडून पाश्चात्त्य युरोपीयन गणवेशाला प्राधान्य देण्यात आले आहे. यामध्ये जवानांना उपयुक्त ठरणारे जॅकेट, ट्राउझर, हूड फायरमन, हातमोजे यांचा समावेश असणार आहे.
nगणवेशाच्या दर्जाची खरेदी करताना त्रयस्थ संस्थेकडून तपासणी केली जाणार आहे. जॅकेटसाठी सात कोटी ७२ लाख, ट्राऊझरसाठी पाच कोटी ८० लाख, हूड फायरमनसाठी ६३ लाख १५ हजार, हातमोज्यांसाठी एक कोटी ५० लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.