महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) वीज दरवाढीला मंजुरी दिली आहे. दरम्यान, यानंतर मुंबईतील तुमच्या इलेक्ट्रीक वाहनांच्या चार्जिंगच्या किंमतीत वाढ झाली आहे. नियामक प्राधिकरणानं शहरातील ईव्ही स्टेशन्सवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात १४-१८ टक्के वाढ करण्यास मान्यता दिली आहे.
अदानी इलेक्ट्रीसिटीद्वारे ईव्ही स्टेशनवरील टॅरिफमध्ये १४ टक्क्यांची वाढ करण्यात येणार आहे. तर बेस्ट १६ टक्के दरवाढ लागू करणार आहे. टाटा पॉवरचा वापर करणाऱ्या वाहनांना चार्जिंगसाठी १८ टक्के अधिक शुल्क द्यावं लागणार आहे.
केव्हा मिळेल सूट?अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईतील इलेक्ट्रीक वाहन चार्जिंगसाठी सर्व वीज कंपन्यांसाठी सुधारित दर आता ७.२५ रुपये/युनिट करण्यात आला आहे. रात्री १० ते सकाळी ६ वाजेपर्यंत चार्जिंगसाठी वीज कंपन्यांना प्रति युनिट १.५० रुपये सवलत दिली जाणार आहे.
एमईआरसीनं या संदर्भात एक अधिसूचना जारी केली आहे. हे सुधारित दर बॅटरी स्वॅपिंग स्टेशनसह सर्व ईव्ही चार्जिंग स्टेशनला लागू होणार असल्याचं त्यात म्हटलंय. रेस्तराँ आणि सुविधा स्टोअर्स सारख्या इतर ठिकाणी चार्जिंग स्टेशन व्यावसायिक श्रेणीसाठी लागू असलेल्या दरानुसार ग्राहकांकडून शुल्क आकारतील. वैयक्तिक युझर्स या श्रेणी अंतर्गत ईव्ही चार्जिंगसाठी स्वतंत्र कनेक्शन देखील घेऊ शकतात, असं यात स्पष्ट करण्यात आलंय.