परीक्षांचे मूल्यांकन आॅनलाइनच , उच्च न्यायालयाची विद्यापीठाला परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 04:25 AM2017-12-07T04:25:58+5:302017-12-07T04:26:24+5:30
उन्हाळी परीक्षांचे निकाल लावताना आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे जो गोंधळ उडाला, त्याची पुनरावृत्ती हिवाळी परीक्षांमध्ये होणार नाही
मुंबई : उन्हाळी परीक्षांचे निकाल लावताना आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीमुळे जो गोंधळ उडाला, त्याची पुनरावृत्ती हिवाळी परीक्षांमध्ये होणार नाही. सर्व तांत्रिक बाबींची काळजी घेण्यात आली आहे, असे आश्वासन मुंबई विद्यापीठाने उच्च न्यायालयाला बुधवारी दिले. त्यामुळे न्यायालयाने विद्यापीठाला हिवाळी परीक्षांमध्येही आॅनलाइन मूल्यांकन पद्धतीचा वापर करण्यास परवानगी दिली.
‘बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स’ या संघटनेने आॅनलाइन मूल्यांकनाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. प्राध्यापकांना याचे प्रशिक्षण न देता व पुरेसे संगणक आणि अत्यावश्यक वस्तू न पुरविता, अचानक आॅनलाइन उत्तरपत्रिका मूल्यांकन पद्धती सुरू झाली. सर्व तांत्रिक अडथळे दूर करूनच ही पद्धत वापरावी, अशी विनंती याचिकेत होती. या याचिकेवरील सुनावणी न्या. भूषण गवई व न्या. मनीष पितळे यांच्या खंडपीठापुढे होती.
सर्व तांत्रिक अडथळे दूर : ‘आॅनलाइन मूल्यांकनातील तांत्रिक अडथळे दूर केल्याचे विद्यापीठाने न्यायालयाला सांगितले. विद्यापीठाचे वकील रुई रोड्रीग्स यांनी हिवाळी परीक्षा पंधरवड्यात संपतील आणि त्यांचे निकाल ४५ दिवसांत लागेल, असे स्पष्ट केले. या याचिकांवरील सुनावणी १४ फेब्रुवारीला आहे.