लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई :मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२२-२३ च्या उन्हाळी सत्राच्या मुख्य परीक्षेचे शेवटच्या सत्राचे मूल्यांकन अंतिम टप्प्यात आले आहे. सर्वसाधारण पाच लाख उत्तरपत्रिकांपैकी साडेचार लाख उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन झाले आहे. महत्त्वाच्या परीक्षेचे निकाल वेळेवर जाहीर करण्याचे नियोजन विद्यापीठाने केले आहे.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.डी.टी. शिर्के हे दोन महिन्यांपासून परीक्षा विभागात बसून मूल्यांकनावर प्रत्यक्ष लक्ष देत असून, प्रकुलगुरू डॉ.अजय भामरे यांनी विद्याशाखानिहाय प्राचार्य व प्राध्यापक यांच्याशी समन्वय साधून मूल्यांकनाचा वेग वाढविला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.प्रसाद कारंडे यांनी ऑन स्क्रीन मार्किंग पद्धत, विविध महाविद्यालये व परीक्षा विभागातील विविध विभागांशी समन्वय साधून हे मूल्यांकन वेळेत करून घेतले. यामुळे जवळजवळ महत्त्वाच्या सर्व परीक्षांचे ८०% मूल्यांकन पूर्ण झाले असून, लवकरच निकाल जाहीर होतील.
बीकॉम सत्र ६चे मूल्यांकन ९८ % पूर्ण
बीकॉम. ६३ हजार विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. यातील बीकॉम सत्र ६ चे ९८% मूल्यांकन पूर्ण झाले आहे. बीएमएस सत्र ६ चेही मूल्यांकन ७५% झाले आहे, तसेच कला शाखेचे मूल्यांकन ८०% , विज्ञान शाखेचे मूल्यांकन ८५ %, तर अभियांत्रिकी शाखेचे मूल्यांकन ९०% पूर्ण झाले आहे. यामुळे बीकॉम सत्र ६, बीए सत्र ६, बीएससी सत्र ६, बीएमएस सत्र ६ व अभियांत्रिकी सत्र ८ चे निकाल वेळेवर जाहीर होतील.