Join us

जागतिकीकरण ,आर्थिक संकटाच्या मूल्यमापन काळाचा लेखनावरही परिणाम- डॉ रवींद्र शोभणे

By मनोहर कुंभेजकर | Published: April 07, 2024 5:49 PM

मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वार्षिकोत्सव सोहळा उत्साहात साजरा

मुंबई-मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या  शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वार्षिकोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.९७ व्यां अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहत्यिक डॉ रवींद्र शोभणे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला.

 डॉ रवींद्र शोभणे यांनी मराठी साहित्य  समकालीन वास्तव आणि अपेक्षा याविषयावर व्याख्यान देताना सांगितले की, ९० च्या आधी आणि ६० वर्षानंतर मराठी साहित्यात मनोरंजन आणि वास्तववादी लेखन हे दोन प्रकार होते. ९० नंतर हा ट्रेण्ड बदलला आहे. जागतिकीकरण, आर्थिक संकटाचा लेखनावरही परिणाम झाला. हा मूल्यमापनाचा काळ होता. जसे लोक आतून बदलले तसे लेखकाचे विचारही बदलले, असे ते म्हणाले.

या सोहळ्यानिमित्त आयोजित साहित्य, नाट्य, ग्रंथालयकर्मी पुरस्कार सोहळ्यात अभिनेता भरत जाधव यांना सध्या रंगभूमीवर गाजत असलेल्या  अस्तित्व या नाटकातील भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट कलावंत म्हणून  नटवर्य मामा पेंडसे पारितोषिक देण्यात आले. तसेच याच नाटकासाठी तरुण लेखक स्वप्नील जाधव यांना देखील उत्कृष्ठ नाटककारख म्हणून नटवर्य मामा पेंडसे पुरस्कार देण्यात आला. 

त्याचबरोबर रंगभूमीवरील १५ वर्षे कार्य करणारे कलावंत प्रकाशयोजनाकार शीतल तळपदे यांना  नटवर्य केशवराव दाते  पुरस्काराने  मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या वतीने  डॉ रविंद्र शोभणे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.

 या कार्यक्रमाला मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष डॉ.प्रदीप कर्णिक, विश्वस्त अरविंद तांबोळी, कार्याध्यक्ष शीतल करदेकर, प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे, कार्यवाह उमा नाबर ,खजिनदार जयवंत गोलतकर,कार्योपाध्यक्ष मारूती नांदविस्कर आदी पदाधिकारी व सर्व शाखा व स्वायत्त विभागाचे पदाधिकारी ,कर्मचारी व साहित्यप्रेमी उपस्थित होते.

प्रा वि ह कुलकर्णी पारितोषिक, किरण शिवहर डोंगरदिवे यांच्या 'देशभक्त ही सो उर्फ बाबुराव पाटील' या चरित्र ग्रंथाला देण्यात आले.तर आयएसएस पाटकर विद्यालयाच्या गीता शेट्टीगार यांना  कवी प्रफुल्ल दत्त स्मारक 'आदर्श शिक्षक' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.ग्रंथपालन वर्ग गुणवंत विद्यार्थी पुरस्कार सुलभा व  गणेश फाटक यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पुरस्कार गीता भरत साळुंखे (मराठी माध्यम), ज्योती मनोज शुक्ला (इंग्रजी माध्यम) यांना देण्यात आला कै. डॉ .श्री .शां .आजगावकर फिरती ढाल नायगाव शाखेला सर्वोत्कृष्ट कार्य करण्यासाठी देण्यात आली तर कै. स. बा. महाडेश्वर फिरती ढाल ही काळाचौकी विभागाला अचूक हिशेबासाठी देण्यात आली.तसेच डॉ.रा.को .फाटक पुरस्कार रेखा हिवाळे (विक्रोळी शाखा), सचिन फडके (ठाकूरद्वार शाखा )प्रतीक्षा पवार (वडाळा शाखा) यांना देण्यात आली.

'रामचंद्र डिंगे पुरस्कृत सेवक पारितोषिक' जयश्री भोसले (बोरवली श्रीकृष्ण नगर शाखा ),वंदिता तोंडवळकर (संदर्भ विभाग ) संचिता सावंत (संदर्भ विभाग )यांना देण्यात आले 'जयश्री पावसकर स्मृती पारितोषिक' सुनंदा डांगोदरा( बोरवली पश्चिम शाखा) रेणुका मालप ( मध्यवर्ती कार्यालय) प्रतीक्षा जाधव (गोरेगाव पश्चिम शाखा) वर्षा सुर्वे (गोरेगाव पूर्व विभाग )यांना देण्यात आले. 'चंद्रिका नाडकर्णी स्मृती पारितोषिक' योगिता यद्रे (नायगाव शाखा) यांना तर 'रंगनाथ त्र्यंबक एरंडे परितोषिक 'मंगेश आयरे (शिपाई संदर्भ विभाग) यांना देण्यात आले.

सभासद वाढीचे श्रेय सेवकाना

मुंबई मराठी ग्ंथसंग्रहालयाच्या दादर, नायगाव, ठाकूरद्वार, बोरिवली पश्चिम या शाखानी १ हजार सभासद संख्येचा टप्पा ओलांडला आहे. तर काही शाखांची सभासद संख्या ५०० च्या वर गेली आहे. याचे सर्व श्रेय त्या त्या शाखेतील सेवकांना जाते. हा पुढेही सभासद नोंदणीचा टप्पा वाढत जाईल, असा विश्वास प्रमुख कार्यवाह रवींद्र गावडे यांनी प्रास्तविकात व्यक्त केला. 

टॅग्स :मुंबई