नियमांचा फज्जा होत असलेल्या दादर मार्केटचे स्थलांतर टळले, कोरोना नियंत्रणासाठी नियमित चाचण्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 09:53 AM2021-03-20T09:53:15+5:302021-03-20T09:55:46+5:30
दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत असल्याने दादर येथील बाजारपेठ पुन्हा अन्यत्र स्थलांतरित करण्याचा महापालिकेचा विचार सुरु आहे.
मुंबई: मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर परिसरातील गर्दी पालिकेसाठी मोठे आव्हान ठरत आहे. या भागात दररोज रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे दादरमधील बाजारपेठेत शनिवारपासून चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. तसेच विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पोलिसांच्या मदतीने कारवाईचा दंडुका दाखवण्यात येणार आहे.
दररोजच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ दिसून येत असल्याने दादर येथील बाजारपेठ पुन्हा अन्यत्र स्थलांतरित करण्याचा महापालिकेचा विचार सुरु आहे. मात्र, मुंबईत अनलॉक करण्यात आल्यामुळे आता बाजारपेठेचे स्थलांतर करणे शक्य नाही. त्यामुळे महापालिकेने बाजारातील गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याचा निर्णय घेतला आहे, त्यानुसार शनिवारी दादर पश्चिम येथील केशवसूत पुलाजवळ चाचणी शिबिर ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, शुक्रवारी दादर परिसरात २९ नवीन रुग्णांची नोंद झाली तर धारावीमध्ये २९ आणि माहीममध्ये २६ कोरोना रुग्ण आढळले आहेत.
धारावी, माहीम आणि दादर परिसरात चाचणीचे प्रमाण वाढविण्यात आल्यामुळे रुग्णसंख्येत वाढ दिसून येत आहे. मात्र, ही चाचणी लगेच होत असल्याने त्वरित निदान होऊन उपचार करणे शक्य होत आहे. तसेच बाधित रुग्णांमध्ये ७० टक्के रुग्ण हे लक्षणविरहीत असून, त्यांना गृह अलगीकरणात अथवा संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर जी उत्तर परिसरात मृत्यूचे प्रमाणही सर्वात कमी असल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे.
दादर परिसरात बाजारपेठेत कोरोना चाचणीचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे तसेच विनामास्क फिरणार्या नागरिकांवरील कारवाई तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी पोलिसांचीही मदत घेण्यात येईल.
- किरण दिघावकर, सहाय्यक आयुक्त,
जी उत्तर विभाग