Join us

मकर संक्रांतीच्या तोंडावर तीळ, साखरेचे भाव वधारले 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 7:17 AM

Mumbai : पेट्रोल व डिझेलने शंभरीच्या जवळ मजल मारल्याने या सर्वांचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो.

मुंबई : यंदाच्या मकरसंक्रांतीवर कोरोना सोबतच महागाईचेही सावट आहे. साखर, तीळ आणि गुळाचे भाव लॉकडाऊननंतर वाढले आहेत. यामुळे चिक्की व लाडू यांचेही भाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे ‘तीळ-गूळ घ्या, गोड गोड बोला ’ या वाक्यातील गोडवा महागाईमुळे कमी झाला आहे. लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांनी उसाची लागवड कमी प्रमाणात केली होती. त्यात वाहतूक खर्चही काही प्रमाणात वाढला आहे. पेट्रोल व डिझेलने शंभरीच्या जवळ मजल मारल्याने या सर्वांचा थेट परिणाम बाजारभावावर झाला आहे. मकरसंक्रांत हा भारतातील एक महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. संक्रांतीच्या दिवशी आप्तस्वकीयांना तीळगूळ वाटून बंधुभाव वृद्धिंगत होण्यासाठी शुभेच्छा दिल्या जातात. कोरोना व त्यानंतर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदा बाजारात तीळ आणि गुळाची आवकही कमी झाली. यामुळे ऐन संक्रांतीच्या तोंडावर तीळ, गूळ आणि साखरेचे भाव पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहेत.

तीळ भावमकरसंक्रांतीमध्ये बनवण्यात येणार्‍या गोड पदार्थांमध्ये तीळ आवर्जून वापरला जातो. लॉकडाऊनच्या आधी १८० रुपये किलो असणारे तीळ मकरसंक्रांतीच्या तोंडावर २०० रुपये किलो झाले आहेत.गूळ भावलॉकडाऊन व त्यानंतर पडलेला अवकाळी पाऊस यामुळे उसाच्या शेतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. त्यामुळे किरकोळ बाजारात गुळाचा भाव काही प्रमाणात वाढला. लॉकडाऊनआधी ६० रुपये किलो असणारा गूळ लॉकडाऊननंतर ७० रुपये किलो इतका झाला आहे.साखर भावलॉकडाऊनच्या काळात वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. त्यानंतर डिझेलचे दर वाढल्यामुळे मुंबईत येणारी साखर काही प्रमाणात महागली. लॉकडाऊनआधी ३४ रुपये किलो असणारी साखर लॉकडाऊननंतर ३८ रुपये किलो झाली आहे.

मकर संक्रांतीवर यंदा कोरोनाचे सावट असले तरीदेखील गोड पदार्थ बनवण्यासाठी साखर, गूळ यांची मागणी वाढली आहे. सर्व वस्तूंचे भाव पाच ते दहा टक्‍क्‍यांनी वाढले आहेत. असे असूनही ग्राहक खरेदी करत आहेत. पुढील आठवड्यात या सर्व पदार्थांचे भाव स्थिर राहतात की घसरतात हे पाहणे महत्त्वाचे आहे. - रमाकांत म्हस्के, व्यापारी

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव व दिवाळी या सणांमध्ये मिठाई अथवा गोड पदार्थ बाहेरून खरेदी न करता ते घरातच बनविण्यात आले. मकरसंक्रांतीलाही दरवर्षी घरात गोड बनते. भाव वाढले असले तरीही सण तर साजरा करावा लागणारच, त्यामुळे त्याच उत्साहात यंदाही गोड पदार्थ बनवायचे आहेत.- शैलजा तळेकर, गृहिणी

टॅग्स :व्यवसाय