मराठीचे ‘ई-साहित्य’ विश्व उभारण्यासाठी धडपडणारा अवलिया!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 04:31 AM2018-02-25T04:31:25+5:302018-02-25T04:31:25+5:30
गेल्या काही वर्षांत वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी कायम ओरड होताना दिसते. मात्र हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न तितक्या वेगाने होत नाही. परंतु, इंग्रजी साहित्याचा आवाका पाहता मराठी साहित्यातही तितकीच ताकद आहे आणि संपूर्ण जगापर्यंत ती पोहोचावी या वेड्या ध्यासापायी एक अवलिया धडपडतोय.
गेल्या काही वर्षांत वाचनसंस्कृती कमी होतेय, अशी कायम ओरड होताना दिसते. मात्र हे चित्र पालटण्यासाठी प्रयत्न तितक्या वेगाने होत नाही. परंतु, इंग्रजी साहित्याचा आवाका पाहता मराठी साहित्यातही तितकीच ताकद आहे आणि संपूर्ण जगापर्यंत ती पोहोचावी या वेड्या ध्यासापायी एक अवलिया धडपडतोय. बी.एडचे शिक्षण घेणारा मुंबईकर शैलेश खडतरे याने संकेतस्थळाच्या माध्यमातून मराठी साहित्याचे ई-विश्व उभारण्याचा मानस केला असून त्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करतो आहे.
शैलेशने २०१४ साली ‘ब्रोनॅटो’ या संकेतस्थळाच्या माध्यमातून ई-साहित्याचे विश्व उभारणीसाठी आरंभ केला. या संकेतस्थळाच्या माध्यमातून लेखकांना, प्रकाशकांना, संलग्न तज्ज्ञ मंडळी यांना एक व्यावसायिक व्यासपीठ मिळवून देणे व जगभरातील वाचकांना उत्तम साहित्याचा वाचनानंद मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातात. आजमितीस या संकेतस्थळाच्या माध्यमातून ३५ देशांमध्ये ८५ हजारांहून अधिक ई-पुस्तके डाऊनलोड झाली आहेत. हा आकडा रोज शेकडोने वाढतो आहे, असे शैलेशने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. देशासह अमेरिकेत या पुस्तकांना पसंती मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र रशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, स्वीडन, फ्रान्स या देशांतील वाचकांचाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. सध्या स्वत:ची ४०-४५ पुस्तके संकेतस्थळावर आहेत. या पुस्तकांद्वारे १० लाख कागद वाचविले आहेत.
ई-पुस्तक उद्योग सुरू करताना लेखक-साहित्यिकांना आर्थिक भार न पाडता ते साहित्य जगभर पोहोचविण्याचे आव्हान या संकेतस्थळाने लिलया पेलले आहे. त्यामुळे या माध्यमातून लेखकांचे सक्षमीकरण होते आहे.
कोणत्या देशात किती ई-पुस्तके डाऊनलोड झाली व त्यातील आर्थिक मिळकत किती याचा तपशील आम्ही लेखकांना पाठवतो. किंडलसाठी लेखकांचे अकाउंट तयार करून देतो. जेणेकरून लेखक स्वत:च पुस्तकांचा तपशील पाहू शकतो व मिळकत थेट त्यांच्या अकाउंटवर जमा होते. याविषयी शैलेश म्हणतो की, या माध्यमातून ई-आवृत्ती जगभर उपलब्ध होते.