Join us  

"सरडासुद्धा आत्महत्या करेल हो"; त्या उत्तरानंतर सुषमा अंधारेंचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2023 3:43 PM

नवाब मलिक आज सत्ताधारी गटाच्या बाकावर बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.

मुंबई - नागपूर येथे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरु झाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी पाहायला मिळाली. माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी देखील अधिवेशनासाठी आज सभागृहात हजेरी लावली. राष्ट्रवादीतील फुटीनंतर नवाब मलिक यांची भूमिका नेमकी काय, मलिक हे शरद पवारांच्या बाजुने की अजित पवारांच्या गटात यावरुनही चांगलीच चर्चा रंगली. मात्र, नवाब मलिक आज सत्ताधारी गटाच्या बाकावर बसल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं.

गेल्या अनेक दिवसांपासून नवाब मलिकांनी अजित पवार गटाला पाठिंबा देणार की शरद पवार गटाला याबाबत अधिकृत भूमिका जाहीर केली नव्हती. मात्र आज विधानभवन परिसरात दाखल होताच नवाब मलिक यांनी अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील यांच्या कार्यालयात हजेरी लावली. त्यानंतर, सभागृहात सत्ताधाऱ्यांच्या बाकावर ते शेवटच्या रांगेत बसले. त्यामुळे त्यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यावरुन, शिवसेना नेते आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं. त्यावर, फडणवीसांनीही प्रत्युत्तर दिलं होतं. आता, या वादात शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उडी घेतली आहे. 

पूजा चव्हाणचा बलात्कार करून हत्या केल्याचे आरोप संजय राठोड यांच्यावर भाजपने केले. त्याच संजय राठोडांना मंत्रिमंडळाच्या पंगतीला बसवून घेतले आणि तेच फडणवीस आज नवाब मलिक यांचे मंत्रिपद का काढून घेतले नव्हते, असा प्रश्न विचारतात?, असे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे. तसेच, @Dev_Fadnavis  भाऊ सरडासुध्दा आत्महत्या करेल हो!!, असा खोचक टोलाही त्यांनी फडणवीसांना लगावला.  

काय म्हणाले होते फडणवीस

अंबादास दानवेंच्या या प्रश्नावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले. मला एका गोष्टीच आश्चर्य वाटतं की, ज्यांच्या नेत्यांनी भूमिका घेतली की प्रत्यक्ष व्यक्ती तुरुंगात असताना देखील मंत्रिपदावरुन काढणार नाही, ते आता इकडे भूमिका मांडत आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच आम्ही कोणाच्या मांडीला मांडी लावून बसलेलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहे. आमच्या बाजून अजितदादा मांडीला मांडी लावून बसलेत व त्यांच्या बाजूला छगन भुजबळ बसलेत. त्यामुळे तुम्ही काळजी करु नका, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीसांनी दिलं. देशद्रोहाचा आरोप झाल्यानंतर सदर सदस्याला मंत्रिपदावरुन का काढले नाही?, त्यांचा राजीनामा का घेतला नाही?, याचं उत्तर आधी द्या, असं प्रश्न देवेंद्र फडणवीसांनी उपस्थित केला.

टॅग्स :सुषमा अंधारेदेवेंद्र फडणवीसनवाब मलिक