१६ वर्षांनंतरही ‘तुंबा’पुरीला दिलासा नाहीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:06 AM2021-07-26T04:06:28+5:302021-07-26T04:06:28+5:30

मुंबई : मागील काही वर्षांमध्ये पावसाचा कल बदलला आहे. चार महिने बरसण्याऐवजी कमी वेळेत जास्त पाऊस कोसळून मुंबईची दैना ...

Even after 16 years, Tumba Puri is not relieved | १६ वर्षांनंतरही ‘तुंबा’पुरीला दिलासा नाहीच

१६ वर्षांनंतरही ‘तुंबा’पुरीला दिलासा नाहीच

Next

मुंबई : मागील काही वर्षांमध्ये पावसाचा कल बदलला आहे. चार महिने बरसण्याऐवजी कमी वेळेत जास्त पाऊस कोसळून मुंबईची दैना उडवत आहे. यंदाचे वर्षही यास अपवाद नाही. नदी-नाल्यांचे रुंदीकरण, पंपिंग स्टेशन, पर्जन्य जलवाहिन्यांची दर्जोन्नती अशा प्रकल्पांवर १६ वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. परंतु, प्रत्येक पावसाळ्यात पाणी तुंबण्याची ठिकाणे वाढतच असल्याचे दिसून येत आहे. तर मिठी नदीमुळे आजही धडकी भरत आहे.

मुंबईला २६ जुलै २००५ रोजी बसलेल्या पुराच्या तडाख्यानंतर राज्य सरकारने डॉ. माधव चितळे यांची समिती नियुक्त केली. या समितीच्या शिफारशीनुसार गेल्या १६ वर्षांमध्ये अनेक प्रयोग करण्यात आले. प्रस्तावित आठपैकी सहा पंपिंग स्टेशन उभारण्यात आले. पर्जन्य जलवाहिन्यांची पाणी वाहून नेण्याची क्षमता ताशी २५ मिलिमीटरवरून ५० मिलिमीटर करण्यात आली. अशी सुमारे दोन हजार कोटींची कामे करण्यात आली. मात्र अद्याप कोणती सुधारणा दिसून आलेली नाही.

पाणी तुंबण्याच्या ठिकाणांमध्ये वाढ

भौगोलिक रचना आणि बशीसारख्या आकारामुळे मुंबईतील सखल भाग दरवर्षी पाण्याखाली जातात. काँक्रिटीकरणाने पावसाचे पाणी मुरण्याचे मार्गही बंद झाले आहेत. पर्जन्यवाहिन्यांची क्षमता ताशी ५० मिलिमीटर असल्याने समुद्रात मोठी भरती असल्यास शहरात पाणी शिरते. कोस्टल रोड आणि मेट्रो रेल्वेसारख्या पायाभूत प्रकल्पामुळे पाणी तुंबण्याची ठिकाो गेल्या काही वर्षांमध्ये वाढल्याचा आरोप पर्यावरण तज्ज्ञांकडून केला जात आहे.

ब्रिमस्टोवॅड, पंपिंग स्टेशनची कामे अर्धवट

या प्रकल्पांतर्गत हाजी अली, ईला, लव्हग्रोव्ह, क्लिव्हलँड, ब्रिटानिया आणि गझदरबंध ही सहा पंपिंग स्टेशन कामे पूर्ण होऊन ती कार्यान्वित झाली आहेत. परंतु मोगरा व माहुल या दोन उदंचन केंद्रांची कामे अद्याप सुरू झालेली नाहीत. आतापर्यंत या पंपिंग स्टेशनच्या उभारणीस वार्षिक देखभालीवर सुमारे एक हजारहून अधिक कोटी रुपये खर्च करण्यात आले. तरी त्याचा उपयोग दिसून आलेला नाही. ब्रिटानिया पंपिंग स्टेशनवर ११५ कोटी रुपये खर्च केल्यानंतरही हिंदमाता येथे तुंबणारे पाणी अन्य ठिकाणी वळवण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. तर नदी-नाल्यांच्या रुंदीकरणात काही ठिकाणी अतिक्रमणाचा रोडा आहे.

मगर‘मिठी’आजही कायम

मिठी नदीची सफाई व रुंदीकरणावर आतापर्यंत एक हजार कोटीहून अधिक रुपये खर्च झाले आहेत. तर उर्वरित कामांसाठी ९८० कोटी रुपये खर्च केले जात आहेत. वार्षिक मिठी नदीची साफसफाई आदी कामांवर चार हजार कोटींपेक्षा अधिक खर्च करण्यात आले आहेत. वांद्रे-कुर्ला संकुलातून मिठी नदी खाडीवाटे समुद्राला मिळते. त्या खाडी व समुद्र परिसरातील मिठीचे मुख हे अरुंद असल्याने पाण्याच्या प्रवाहाची गती संथ होऊन पाणी मागे फिरते. आहोटीच्या वेळी पाणी तुंबते असे सांगण्यात येते. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्च करूनही कुर्ला व आसपासच्या परिसरातील रहिवाशांना प्रत्येक पावसाळ्यात जीव मुठीत घेऊन राहावे लागते.

Web Title: Even after 16 years, Tumba Puri is not relieved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.