मुंबई - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी अखेर मंगळवारी राजभवनात पार पडला. आता, खातेवाटपाची चर्चा होऊ लागली आहे. शिंदे-फडणवीस सरकारमध्ये एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. हे सर्व कॅबिनेट मंत्री असणार आहेत अशी माहिती समोर आली आहे. त्यात आता कुणाला कोणतं खातं मिळणार याबाबत विचारण्यात आलं. त्यावेळी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टाळाटाळ करत वेगळंच उत्तर दिलं होतं. आता, विरोधकांकडून खातेवाटप कधी होणार, असा सवाल शिंदे सरकारला विचारला जात आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त धुळे तालुक्यातील कापडणे येथून आझादी गौरव पदयात्रेला माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. या पदयात्रेत धुळे तालुक्यातील ग्रामस्थ तसेच काँग्रेसचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी बोलताना माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टिका केली. 24 तास उलटूनही अद्याप खातेवाटप झालं नाही, असा टोला थोरात यांनी लगावला आहे.
महागाईवरुनही मोदी सरकावर टिका
देशात सध्या सर्वत्र महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गोरगरिबांच्या भाकरीवर आणि दुधावरही जीएसटी लावला आहे. इंग्रजांनी मीठावर कर लावला होता. आता, भाजप सरकारने पिठावर कर लावला आहे. त्यात गरीबांचं जगणं हराम करण्याचं काम सध्या देशात सुरू आहे. म्हणून हुकूमशाही व बेरोजगारी विरोधात उभं राहण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे, अशी प्रतिक्रिया माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यावेळी दिली.
खातेवाटपाबाबत काय म्हणाले फडणवीस
मंत्र्यांचं खातेवाटप कधी होणार असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी फडणवीस यांना विचारलं असता ते तर तुम्हीच करुन टाकलंय अशी मिश्किल टिप्पणी फडणवीसांनी केली. ते ठाण्यात 'लोकमत'च्या कार्यालयाच्या उदघाटनावेळी प्रसार माध्यमांशी बोलत होते. "माध्यमांनीच खातेवाटप करुन टाकलं आहे. आमच्या करता खातेवाटप शिल्लकच ठेवलेलं नाही. पण तुम्ही जे खातेवाटप केलं आहे ते सपशेल चुकीचं ठरेल एवढं मी नक्की सांगतो", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. फडणवीसांच्या या विधानामुळे नव्या मंत्र्यांच्या खातेवाटपात शिंदे सरकार धक्कातंत्राचा वापर करेल अशी दाट शक्यता निर्माण झाली आहे.