४८ तासानंतरही ‘जीएस’मधील रॅगिंगप्रकरणी कारवाई शून्य

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2022 09:52 AM2022-01-17T09:52:15+5:302022-01-17T09:53:01+5:30

वॉर्डनसह १७ जणांविरुद्ध ॲट्रॉसिटीचा गुन्हा

Even after 48 hours, no action was taken in the ragging case in GS | ४८ तासानंतरही ‘जीएस’मधील रॅगिंगप्रकरणी कारवाई शून्य

४८ तासानंतरही ‘जीएस’मधील रॅगिंगप्रकरणी कारवाई शून्य

Next

मुंबई : महापालिकेच्या  केईएम रुग्णालयाशी संलग्न जीएस मेडिकल कॉलेजमधील तिघा वॉर्डनसह १७ जणांवर एका विद्यार्थ्याचा छळ व जातीवाचक अपशब्द वापरल्याप्रकरणी भायखळा पोलीस ठाण्यात रॅगिंग आणि ॲट्राॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला ४८ उलटले असले तरी अद्याप पोलिसांनी कुणावरही कारवाई केलेली नाही. 

 हिंगोली जिल्ह्यातील रहिवासी असलेला सुगत पडलघ हा जीएस मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्युपेशनल थेरपीच्या तिसऱ्या वर्षात आहे. डिसेंबर २०२१ मध्ये त्याच्या खोलीतील मित्र आणि वर्गमित्रांकडून त्याच्या जातीवरून त्याचा शारीरिक आणि मानसिक छळ केला जात आहे. डिसेंबर २०१८ मध्ये सुरू झालेल्या छळामुळे त्याला एक वर्ष वगळावे लागले. वसतिगृहाचे वॉर्डन आणि कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ. हेमंत देशमुख यांच्याकडे लेखी तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नसल्याचा दावाही विद्यार्थ्याने केला होता. आरोपांच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने तक्रारी मान्य केल्या नाहीत. त्यानंतर विद्यार्थ्याने भोईवाडा पोलीस ठाण्यात लेखी तक्रार केली होती.

 त्यानुसार १३ विद्यार्थी, वॉर्डन आणि इतरांसह एकूण १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. छळाबद्दल  एका महिनाभरापूर्वी कारवाईची मागणी केली होती; मात्र कारवाई न केल्यामुळे सुबोध मोरे, रवी भिलाणे, अमोल निकाळजे, सुनील कदम, स्वाती लावंड आदी कार्यकर्त्यांनी पाठपुरावा केल्याने गुन्हा दाखल झाला.

महाविद्यालयातून काढण्याची धमकी
 जातीवाचक शिवीगाळ करणे, अपशब्द वापरणे, झाडू मारायला, भांडी घासायला लावणे, मृतदेह नेणाऱ्या स्ट्रेचरवर झोपविणे असा त्याला त्रास दिला जात होता. त्यासंदर्भात  पीडित विद्यार्थ्याने वॉर्डन सुनील कायुरे, समाधान किटकरी आणि समाधान सोनवलकर यांच्याकडे तक्रार केली होती. त्यावर कारवाईचे सोडून उलट डॉ. कुयरे यांनी त्याला व त्याच्या पालकांना महाविद्यालयामधून काढून टाकण्याची धमकी दिली होती. त्यांनीही आरोपी विद्यार्थ्यांची बाजू घेतल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबत उपायुक्त एस चैतन्य यांच्याशी संपर्क साधला असता फोन उचलला नाही. मेसेज केला असता ‘’ नो कॉमेंट्स’’ असे उत्तर दिले.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
वॉर्डन डॉ. सुनील कुयरे, डॉ. समाधान मिटकरी, सोमनाथ सोनवलकर यांच्यासह सुमित मालवणकर, साक्षी पलसमकर, अंकिता राख, श्रुती कांबळे, ऋतिका कुंदळे, अमेघ पाटील, योगेश शिगाणे, रामेश्वर तगडे, देवेश अटकारे, प्रसाद गुंजल, दिव्यल बिचकुले, वैभव झुंझुडे आदींवर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Even after 48 hours, no action was taken in the ragging case in GS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.