Join us

स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही आदिवासी पाडे मूलभूत सुविधांपासून वंचित

By ऑनलाइन लोकमत | Published: December 07, 2020 1:47 AM

Mumbai News : राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी नुकतीच गोराई येथील मुंडा आदिवासी पाडा, छोटी डोंगरी व मोठी डोंगरी आदिवासी पाड्यांना नुकतीच भेट दिली.

- मनोहर कुंभेजकरमुंबई : स्वातंत्र्याच्या ७३ वर्षांनंतरही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील बोरीवली पश्चिम  गोराई खाडीपलीकडील गोराई येथील आदिवासी पाडे आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत.राज्यातील आदिवासी बांधवांसाठी काम करणाऱ्या अभिषेक सामाजिक व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा सुनीता नागरे यांनी नुकतीच गोराई येथील मुंडा आदिवासी पाडा, छोटी डोंगरी व मोठी डोंगरी आदिवासी पाड्यांना नुकतीच भेट दिली. येथील आदिवासी पाड्यांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी गोराई रिसोर्ट  असोसिएशनचे अध्यक्ष व समाजसेवक जोरम राजा कोळी उपस्थित होते. मुंंडा, छोटी डोंगरी व मोठी डोंगरी आदिवासी महिलांना व त्यांच्या कुटुंबाला ५०० मास्कचे वाटप जोरम राजा कोळी यांच्या हस्ते करण्यात आले.मुंडा आदिवासी पाड्यात स्वातंत्र्याचा ७३ वर्षांनंतरही तेथे मूलभूत गरजा पोहोचलेल्या नाही.  येथील आदिवासी पाड्याला अजूनही पालिकेचे  पाणी किंवा बोरींगचे पाणी मिळालेले नाही. येथील आदिवासी बांधव आजही एका पाण्याच्या ड्रमला १०० रुपये या दराने पाणी विकत घेऊन आपली उपजीविका चालवत आहे. पिण्यासाठी पाणी नाही, अंघोळी व धुणीभांडी या सर्व दिनक्रमाला लागणारे पाणी त्यांना विकत घ्यावे लागत आहे. सध्या कोरोना काळात त्यांच्या हाताला  कामधंदा नाही. दोन वेळेच्या अन्नासाठी मारामारी करावी लागते, मग अशा परिस्थितीत ते पाणी कसे विकत घेणार हा खूप मोठा प्रश्न आहे. येथील आदिवासी पाड्यांच्या विदारक समस्यांचा पाढाच येथील संजय कोलेकर व संगीता वाघे यांनी सुनीता नागरे यांना कथन केला.गोराई गावात पालिकेचे छोटे हॉस्पिटल असून ते फक्त तीन वाजेपर्यंत सुरू असते. या हॉस्पिटलमध्ये ठरावीकच औषधे उपलब्ध असून सर्पदंशावर औषधे नाहीत. प्रसूतिगृहाची सुविधा गोराईत उपलब्धच नसल्याने  त्यांना उपचारार्थ  भाईंदर किंवा बोरीवलीला जावे लागते  एवढा लांबचा पल्ला गाठेपर्यंत  जीवितहानी होण्याची शक्यता असते. याकडे राज्य सरकार व मुंबई महापालिकेने  गांभीर्याने लक्ष द्यावे, ही येथील रहिवाशांतर्फे प्रशासनाला कळकळीची विनंती करण्यात येणार असल्याचे सुनीता नागरे यांनी सांगितले. मोठा डोंगरी आदिवासी पाड्यातील काही नागरिकांना  लाईट अजूनही मिळालेली नसून पालिकेचे  पाणीही अजून मिळालेले नाही. जातीचा दाखला नसल्यामुळे शासनाच्या योजनांचा लाभ त्यांना घेता येत नाही. जातीचा दाखला मिळत नाही,  कारण त्यांच्याकडे ५० ते ५४ सालचा काही पुरावा नाही.  

पालिका प्रशासनाचे लक्ष नाहीछोटी डोंगरीपाडा येथील बाथरूमच्या टाक्या भरलेल्या आहेत. येथे झाडू रोजच्या रोज मारला जात नाही. या आदिवासी पाड्यात प्रामुख्याने  पाणी प्रश्न आहे याकडे पालिका प्रशासनाचे लक्ष नाही. येथील वनिता कोटम या आदिवासी महिलेने येथील विदारक स्थिती कथन केल्याची माहिती त्यांनी दिली. येथील आदिवासी पाड्यांच्या समस्या महापालिका व शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी अभिषेक सामाजिक संस्था प्रयत्नशील असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले. 

टॅग्स :महाराष्ट्रमुंबई