अपघातानंतरदेखील गोवंडी येथील पुलाचा सांगाडा ‘जैसे थे’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 01:25 AM2020-02-26T01:25:29+5:302020-02-26T01:25:32+5:30
तीन आठवडे उलटूनदेखील पुलाचा उर्वरित सांगाडा हवेत ‘जैसे थे’
मुंबई : घाटकोपर-मानखुर्द जोडरस्त्यावरील गोवंडीमधील बैंगनवाडी सिग्नल येथे नव्याने पादचारी पूल बांधण्यात येत आहे. ३० जानेवारी रोजी मध्यरात्री ट्रकच्या धडकेत या पुलाचा सांगाडा वाहनांवर कोसळला होता. या घटनेला तीन आठवडे उलटूनदेखील पुलाचा उर्वरित सांगाडा हवेत ‘जैसे थे’ आहे. यामुळे वाहनचालक व आसपासच्या परिसरामध्ये राहणारे नागरिक हा सांगाडा काढण्याची मागणी करत आहेत.
३० जानेवारी रोजी पूल कोसळून झालेल्या अपघातात चार वाहनांचे नुकसान झाले. तसेच तीन जण जखमी झाले. गोवंडी येथील बैंगनवाडी हा परिसर जास्त लोकवस्ती तसेच वर्दळ असणारा परिसर आहे. पूल दुर्घटना सकाळ अथवा संध्याकाळच्या वेळेस झाली असती तर अनर्थ घडला असता. नव्याने बांधण्यात येणाऱ्या पुलाची उंची कमी असल्याने हा अपघात घडला असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. हा अपघात घडून तीन आठवडे उलटूनदेखील पुलाचा उर्वरित सांगाडा काढला नसल्याने या मार्गावर पुन्हा अपघात घडण्याची शक्यता आहे. संबंधित प्राधिकरणाने पुलाचा सांगाडा काढून टाकावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.