लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : घाटकोपर पोलीस ठाण्यातील एका पोलिसाला लस घेतल्यानंतरही कोरोनाची बाधा झाली आहे.
मुंबई पोलीस दलातही ६ फेब्रुवारीपासून १२ परिमंडळअंतर्गत पोलिसांनाही कोरोना लस देण्यात येत आहे. यात लसीकरणानंतर ताप येणे, लस घेतलेला हात जड वाटणे, थकवा येणे, अशी सौम्य लक्षणे पोलिसांमध्ये दिसून येत आहेत.
मुंबई पोलीस दलातील घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलिसाने १६ जानेवारी रोजी कोरोना लस घेतली. त्यानंतर १७ तारखेला त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. या वृत्ताला घाटकोपर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांनी दुजोरा दिला. त्यांना गेल्या आठ दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. सध्या संबंधित पोलिसावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, लस घेतल्यानंतर मांसाहार, मद्यसेवन करायचे नसते, या गैरसमजातून अनेक जण शनिवारी लस घेण्यास नकार देत असल्याचीही चर्चा पोलिसांमध्ये आहे. जेणेकरून रविवारची पार्टी बिघडू नये, हे यामागचे कारण असल्याचे समजते.
.................
....