सिटी सेंटर मॉलच्या दुर्घटनेनंतरही अद्याप अग्निसुरक्षेबाबबत अनास्था
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2020 06:07 PM2020-11-26T18:07:01+5:302020-11-26T18:07:25+5:30
fire safety : अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोवर मॉल्स बंद ठेवण्यात यावे.
मुंबई : मुंबई सेंट्रल येथील सिटी सेंटर मॉलला लागलेल्या आगीनंतर मुंबई अग्निशमन दलाने अग्निसुरक्षेचे कारण पुढे करत तब्बल २९ मॉल्सची झाडाझडती घेत त्यांना नोटीस बजावली. या कारवाईनंतर अग्नि सुरक्षेबाबत प्रशासनाकडून वेगवान कामकाज होणे अपेक्षित होते. मात्र अद्याप मुंबईतल्या मॉल्स असो वा इतर आस्थापनांत अग्नि सुरक्षेबाबत हलगर्जीपणा बाळगला जात असून, अशा दुर्घटनांत नाहक बळी जात असल्याचे चित्र आहे.
मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतल्या २९ मॉल्सला नोटीस बजाविल्यानंतर येथील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित होत नाही तोवर मॉल्स बंद ठेवण्यात यावे, अशी मागणी लोकप्रतिनिधी करत आहेत. मुळात अशा ठिकाणी एखादी दुर्घटना घडली तर त्यास जबाबदार कोण? असा सवालदेखील लोकप्रतिनिधींनी विचारला आहे. कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेले लॉकडाऊन आता शिथिल होत असून, मुंबई ब-यापैकी पूर्वपदावर येत आहे. मुंबई पूर्व पदावर येत असतानाच मुंबईची मॉल संस्कृतीदेखील खुली झाली आहे.
मात्र खुल्या झालेल्या मॉल्सने अग्नि सुरक्षा विषय नियमांचे पालन करावे. तसेच मॉल्समध्ये कोणत्याही प्रकाराचे अनधिकृत बांधकाम करू नये. आणि तसे केले असल्यास विभागीय सहाय्यक आयुक्तांना संबंधितांवर कारवाई करण्याचे अधिकार आहेत, असे म्हणत मुंबई अग्निशमन दलाने मुंबईतल्या मॉल्सला सूचनांचे, नियमांचे पालन करण्याच्या नोटीस धाडल्या आहेत.