Join us

कोरोनातून बाहेर आल्यानंतरही तिने दिला ११ बेवारस मृतदेहांना अग्नी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 4:06 AM

खाकीतील ती योद्धा म्हणते आता थांबायचे नाही... लढायचेकोरोनातून बाहेर आल्यानंतरही दिला ११ बेवारस मृतदेहांना अग्नीखाकीतील योद्धा म्हणते, ...

खाकीतील ती योद्धा म्हणते आता थांबायचे नाही... लढायचे

कोरोनातून बाहेर आल्यानंतरही दिला ११ बेवारस मृतदेहांना अग्नी

खाकीतील योद्धा म्हणते, थांबायचे नाही, लढायचे!

मनीषा म्हात्रे

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या भीतीने नातेवाइकांच्या अंत्यविधीला जाण्यासाठी आजही नागरिक घाबरत असताना शाहूनगर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अंमलदार संध्या शिलवंत बेवारस मृतदेहांंना अग्नी देत आहेत. कर्तव्यादरम्यान त्यांनाही कोरोनाने गाठले. मात्र शिलवंत यांनी सकारात्मक विचाराने लढा देत कोरोनाला हरवले आणि त्या पुन्हा कर्तव्यावर रुजू झाल्या. त्यानंतर त्यांनी आणखी ११ बेवारस मृतदेहांना अग्नी दिला. त्या सांगतात, थांबायचे नाही, तर लढायचे आहे.

विक्रोळीतील कन्नमवार नगर येथे पती, १३ वर्षांची मुलगी, ९ वर्षांचा मुलगा आणि सासू-सासरे यांच्यासोबत राहणाऱ्या संध्या या शाहूनगर पोलीस ठाण्यात एडीआर कारकून आहेत. आई, पत्नी आणि सून अशा जबाबदाऱ्या पार पाडताना त्या पोलीस दलातील कर्तव्यही नियमित आणि चोखपणे बजावत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत त्यांनी एकाच दिवशी ४ बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले होते. त्यांच्या कामाची दखल घेत तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा सत्कार केला होता.

याच दरम्यान, ऑगस्ट महिन्यात त्यांच्या घरातही कोरोनाने शिरकाव केला. आधी पती, नंतर मुले आणि त्यापाठोपाठ संध्या यांचाही २० ऑगस्ट रोजी कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. मुलांना कोरोनाची बाधा झाल्यामुळे खाकीतील ही आई घाबरली. मात्र त्यानंतर याेग्य औषधाेपचार आणि सकारात्मक विचारांनी कोराेनाला हरवायचे, असा निर्धार त्यांनी केला. सर्वांवरती सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. पुढे सासूलाही काेराेना झाल्याने त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीतही घरातील सर्वांना धीर देत, संध्या यांनी जिद्दीने, आत्मविश्वासाने कोरोनावर मात केली. लवकरात लवकर कामावर हजर राहण्यासाठी त्यांची धडपड सुरू होती. अखेर महिनाभराच्या उपचारानंतर त्या कर्तव्यावर रुजू झाल्या.

संध्या सांगतात, या काळात वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी वेळोवेळी फोन करून चौकशी करत धीर दिला. तसेच सहायक पोलीस निरीक्षक किशोर झोटिंग यांनीही तत्काळ बेड उपलब्ध करून दिल्यामुळे वेळेत उपचार सुरू झाले आणि त्यामुळेच लवकर काेराेनामुक्त व्हायला मदत झाली.

* मानसिकरीत्या सक्षम राहाल तरच कोरोनाला हरवू शकाल!

कोरोनाला हरवल्यानंतर संध्या यांनी आतापर्यंत ११ बेवारस मृतदेहांना अग्नी दिला आहे. सध्याच्या काळात नागरिकांना कोरोनाला घाबरून चालणार नाही. मानसिकरीत्या सक्षम राहिलात तर कोरोनावर लवकर मात करू शकता. सकारात्मक विचार करणे सोडू नका. शासनाच्या नियमांचे पालन करून घरीच राहा, असे संध्या यांनी सांगितले.

-----------------------------