मुंबई : हद्दपारीनंतरही काही गुन्हेगारांची मुंबईत येण्याची धडपड सुरू असल्याचे मुंबई पोलिसांच्या कारवाईत समोर येत आहे. पुढे हद्दपार केले असतानाही मुंबईत वावरणाऱ्यांना कोठड़ीची हवा खावी लागत आहे.
सुरक्षेच्या कारणास्तव दरवर्षी जिल्ह्यातून काही गुन्हेगारांना हद्दपार केले जाते. मात्र अनेकदा पोलिसांना चकवा देत काही गुन्हेगार मुंबईत येतात. मुंबई पोलिसांना याबाबत समजताच त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात येत आहे.
मुंबई पोलिसांकड़ून गेल्या आठवड्यात दिवसाआड़ कारवाई सुरू आहे. हद्दपार आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कबीर उर्फ कन्ना बादशहा शेख (३०) विरुद्ध गुन्हा दाखल करत घाटकोपर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर दुसरीकडे मुंबईतून दोन वर्षाकरिता हद्दपार केले असतानाही गिरगाव परिसरात वावरणाऱ्या आरोपीला व्ही. पी.रोड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. श्यामराव उर्फ राधेश्याम गोविंद सांळुखे (६२) असे आरोपीचे नाव असून गेल्या महिन्यात त्याच्यावर हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. तर डोंगरीतून राजा चंदु खारवा (३२) वर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. तसेच शिवाजी नगर परिसरात वावरत असलेल्या फिरोज फक्रुद्दीन शेख उर्फ फिरोज कोकणी (२७) आरोपीला शिवाजी नगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.