चार फेऱ्यांनंतरही आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा रिक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:05 AM2020-12-27T04:05:12+5:302020-12-27T04:05:12+5:30
पहिल्या ४ फेऱ्यांत थंड प्रतिसाद : समुपदेशन फेरीमध्ये रिक्त जागा भरण्याची केली जात आहे अपेक्षा लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई ...
पहिल्या ४ फेऱ्यांत थंड प्रतिसाद : समुपदेशन फेरीमध्ये रिक्त जागा भरण्याची केली जात आहे अपेक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयटीआय प्रवेशाच्या चौथ्या फेरीला ही थंड प्रतिसाद मिळाला असून, प्रवेशासाठी निवड झालेल्या ४७ हजार ४७७ विद्यार्थ्यांपैकी केवळ ११ हजार ७७८ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश निश्चित केले आहेत. एकूणच आयटीआयच्या चौथ्या फेरीत केवळ २४.११ % प्रवेश निश्चित झाले आहेत. २४ डिसेंबरपासून जिल्हा समुपदेशन फेरीला सुरुवात झाली असून, या फेरीमध्ये ज्या विद्यार्थ्यांना जागा मिळणार आहेत, त्यांनी त्यांचे प्रवेश २९ ते ३१ डिसेंबरदरम्यान निश्चित करायचे आहेत. आयआयटीआय प्रवेशाच्या चार फेऱ्या होऊनही अद्याप राज्यात ५०% प्रवेश ही पूर्ण होऊ शकले नाहीत. जिल्हास्तरीय समुपदेशन फेरीसाठी राज्यात आयटीआयच्या ८० हजारांहून अधिक जागा उपलब्ध आहेत.
राज्यात आयटीआय प्रवेशासाठी कॅप राउंडच्या १ लाख ३२ हजार ९३१ आणि संस्था स्तरावरील, अल्पसंख्यांक जागा मिळून एकूण १ लाख ४६ हजार ५२ जागा उपलब्ध जागा आहेत. यंदा पहिल्या कॅप राउंडमध्ये तब्बल ८८ हजार ६० विद्यार्थ्यांना अलॉटमेंट देण्यात आली. मात्र, त्यावेळी केवळ २६ हजार ८८१ विद्यार्थ्यांनी म्हणजेच केवळ ३० टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चिती केली. त्यानंतर, मराठा आरक्षणाला देण्यात आलेल्या स्थगितीमुळे आयटीआय प्रवेश प्रक्रिया लांबणीवर पडली आणि ५ डिसेंबर ते ८ डिसेंबरदरम्यान मराठा आरक्षण जागा वगळून दुसरा कॅप राउंड पार पडला. मात्र, त्यातही अनेक विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशांकडे पाठ फिरविल्याचे चित्र समोर आले. दुसऱ्या कॅप राउंडमध्ये केवळ १८.८० टक्के तर तिसऱ्या कॅप राउंडमध्ये २०.८९ टक्के प्रवेश विद्यार्थ्यांनी निश्चित केले होते. त्यामुळे चार फेऱ्यांनंतर आयटीआयमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आतापर्यंतची संख्या केवळ ६५ हजार ४८३ इतकी होऊ शकली आहे. अद्याप आयटीआयच्या २०१९मध्ये पहिल्या कॅप राउंडला ३२ हजार २६०, दुसऱ्या कॅप राउंडला १३ हजार ९०९, तिसऱ्या कॅप राउंडला २० हजार २६२ प्रवेश निश्चित झाले होते. मागील वर्षीपेक्षा तिसऱ्या फेरीपर्यंत ८ टक्क्यांनी कमी झाले आहेत. समुपदेशन फेरी, संस्था स्तरावरील प्रवेश अद्याप बाकी असल्याने विद्यार्थी प्रवेशाकडे वळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
------
प्रवेश फेरी - २०२०- २०१९
प्रवेश क्षमता- १,४६,५२- १,४८,२५६
निश्चित प्रवेश - निश्चित प्रवेश - २०२० प्रवेशाची टक्केवारी
कॅप राउंड १- २६,७०१-३२,२६० - ३०.३२%
कॅप राउंड २- १३,५८१- १३,९०९- १८.६७%
कॅप राउंड ३- १३,२४३- २०,२६२- २०.७५%
कॅप राउंड ४- ११७७८-११५५०- २४.८१%