‘नोट’ मिळवूनही पदरी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2016 01:27 AM2016-11-13T01:27:40+5:302016-11-13T01:27:40+5:30
तासन्तास रांगेत उभे राहून मिळवलेली अवघी दोन हजार रुपयांची नोटही ग्राहकांना निराश करत आहे. अनेक त्रास सहन करून मिळवलेली ही नोट नेमकी चालवायची कुठे असा प्रश्न बँकेतून
- सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई
तासन्तास रांगेत उभे राहून मिळवलेली अवघी दोन हजार रुपयांची नोटही ग्राहकांना निराश करत आहे. अनेक त्रास सहन करून मिळवलेली ही नोट नेमकी चालवायची कुठे असा प्रश्न बँकेतून बाहेर आलेल्या प्रत्येक ग्राहकाला पडत आहे. अद्यापही बाजारात ५०० व हजार रुपयांच्या नव्या नोटा उपलब्ध नसल्यामुळे नव्या दोन हजार रुपयांच्या नोटा सुटी करण्याची नवी समस्या निर्माण झाली आहे.
चलनातून ५०० व १००० च्या नोटा बंद झाल्यानंतर शासनाने पर्यायी उपलब्ध केलेली २००० हजार रुपयांची नोट मिळवण्यासाठीदेखील नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. नव्या नोटांची संख्या मर्यादित असल्यामुळे अद्यापपर्यंत एटीएम मशिनमध्ये त्या उपलब्ध झालेल्या नाहीत. केवळ बँकेतच जुन्या नोटांच्या बदल्यात नव्या नोटा मिळत आहेत. त्यावरही मर्यादा असल्यामुळे बँकेबाहेर तासन्तास रांगेत ताटकळत राहिल्यानंतर हाती दोन हजार रुपयांची केवळ एक किंवा दोन नोटा लागत आहेत. सध्याच्या उद्भवलेल्या परिस्थितीपुढे हे दोन हजार रुपयेही प्रत्येकाला तितकेच गरजेचे आहेत; परंतु प्रयत्नांती मिळवलेली दोन हजार रुपयांची नोट चालवायची कुठे असा प्रश्न सतावत आहे. शासनाने दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध केली असली, तरी पाचशे व हजार रुपयांच्या नोटा वापरात बंद असल्यामुळे सुट्याची समस्या सर्वांनाच भेडसावत आहे.
थकित बिले व करभरणा करण्यासाठी नागरिकांकडून जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत १४ नोव्हेंबर करण्यात आलेली आहे. त्यानंतरही अनेक ठिकाणी ग्राहकांची जुन्या-नव्या नोटांवरून अडवणूक सुरूच आहे. नेरूळ येथील बल्लाळेश्वर पतपेढीत अशाच प्रकारामुळे तणाव निर्माण झाला होता. अखेर सामाजिक कार्यकर्ते मनोज मेहर यांनी पतसंस्थाचालकांची भेट घेऊन समस्येवर तोडगा काढण्याची विनंती केली. तर वाशी सेक्टर १ येथील वीज वितरणच्या कार्यालयात बिलाचा भरणा करण्यासाठी गेलेल्यांनाही परत पाठवले जात होते.
दरवाढीने सोनारही त्रस्त
तुलसी विवाहानंतर प्रत्यक्षात लग्न सराईचे दिवस असल्यामुळे मागील काही महिन्यांत अनेकांनी वधूवरांच्या दागिन्यांची आॅर्डर सोनारांकडे दिलेली आहे. अशातच बंद झालेल्या नोटा संपवण्यासाठी अनेकांनी सोनेखरेदीवर भर दिल्यामुळे सोन्याचे दर कमालीने वाढले आहेत. त्यामुळे यापूर्वीच आॅर्डरनुसार बनवायला दिलेले ग्राहकांचे दागिने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सोनारांना खिशाला झळ सोसावी लागणार असल्याची भावना सोनार व्यावसायिक मनोज अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.