महिनाभरानंतरही हॉटेलला केवळ ७ ते८ टक्के ग्राहकांचा प्रतिसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 06:30 PM2020-08-11T18:30:42+5:302020-08-11T18:31:09+5:30
हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाची माहिती
मुंबई : राज्यात ८ जुलै पासून सरकारच्या कार्यपद्धतीनुसार हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. महिनाभरानंतर ४० ते ४५टक्के हॉटेल सुरू झाले असून केवळ ७ ते ८ ग्राहकांचा अशी माहिती हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाने दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षितपणे हाॅटेल व्यवसाय सुरू करण्यासाठी राज्य सरकारकडून एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. त्यानुसार बुधवापासून मिशन बिगिन अगेन अंतर्गत हॉटेल सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
याबाबत हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडियाचे अध्यक्ष गुरबक्षिश सिंग कोहली म्हणाले की ३३ टक्के क्षमतेने हॉटेल सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानुसार हॉटेल सुरू करण्यात आले आहेत. पण अद्यापही आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक, रेल्वेवाहतुक बंद आहे. त्याशिवाय राज्याच्या सीमा बंद असून रस्ते वाहतुकीलाही मर्यादा आहेत. त्यामुळे पुरेसे ग्राहक येत नाहीत.दुसरी बाब म्हणजे हॉटेल सुरू करण्यासाठी कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. हॉटेल क्षेत्रात एकूण कामगारांपैकी ७० टक्के कामगार हे स्थलांतरित आहेत. त्यांना परत येण्यासाठी वाहतुकीची व्यवस्था नाही त्यामुळे ते येऊ शकले नाहीत. इतकेच नाही तर रेल्वे बंद असल्याने कर्मचाऱ्यांना एका शहरातुन दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही. लोकांना बाहेर यायचे आहे पण त्यांच्या मनात भीती आहे. बाहेर आले तर खाण्याची सोय नाही. सर्व नियम पाळून ५० टक्के हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करायला हवे. असे त्यांनी सांगितले
तसेच ते पुढे म्हणाले की, तीन चार महिने हॉटेल व्यवसाय बंद असल्याने मोठे नुकसान झाले आहे. आम्ही सरकारचे सर्व नियमांचे पालन करून हॉटेल सुरू केले आहे. मात्र आम्हाला आजही अनेक अडचणी आहेत. खर्च पूर्ण करावा लागत आहे त्या तुलनेत ग्राहकांची संख्या खुप कमी वीज बिल जास्त येत आहे, तसेच सरकारने उत्पादन शुल्क १५ टक्क्यांनी वाढवला आहे ते चुकीचे आहे असेही ते म्हणाले.
तर रेस्टॉरंट कायमचे बंद होतील
केंद्र सरकारने ८ जून पासून हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर इतर राज्यात नियम पाळून हॉटेल रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहेत. पण इथे रेस्टॉरंट चालू होण्याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही.पाच ते सहा महिन्यांपासून रेस्टॉरंट बंद असून त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी तातडीने पाऊले उचलावीत अन्यथा रेस्टॉरंट कायमचे बंद होतील
- शिवानंद शेट्टी,अध्यक्ष आहार
ग्राहकांचा प्रतिसाद कमीच आहे. पण जी विमान वाहतूक सुरू आहे. त्यामधील प्रवाशांना सक्तीने हॉटेलमध्ये सात दिवस कोरनटाईन व्हावे लागते.पालिकेच्या यादीत द फर्न रेसिडेन्सीचेही नाव आहे त्यामुळे असे प्रवासी सध्या येत आहेत. इतर ग्राहक येण्याचे प्रमाण खुप कमी आहे.
प्रवाशी हॉटेलमध्ये बुकिंग करतात. त्यानंतर त्यांची कोरोनाची चाचणी केली जाते ती नकारात्मक असेल तर पुढील प्रवास करता येतो. चाचणी सकारात्मक असेल पुढील कोरनटाईन किंवा उपचार याबाबत पालिका निर्णय घेते.
- नितीन दळवी,फ्रंट ऑफिस मॅनेजर ,द फर्न रेसिडेन्सी