क्वारंटाइननंतरही त्यांचा वनवास कायम, गॅस सिलिंडरही देण्यास नकार...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2020 01:11 AM2020-04-15T01:11:15+5:302020-04-15T01:11:25+5:30
एका मुंबईकराची व्यथा : संशयित कोरोनाग्रस्ताचा शिक्का कायम
शेफाली परब - पंडित।
मुंबई : दररोज संध्याकाळी कट्ट्यावर बसून गप्पा मारणारे मित्र आज हातदेखील मिळवत नाहीत. सतत रोखलेल्या शेजाऱ्या-पाजाऱ्यांच्या संशयित नजरा त्यांना बैचेन करतात. परदेशी दौरा केला हाच काय तो त्यांचा गुन्हा. त्या एका सहलीने त्यांचे आयुष्य बदलून टाकले आणि त्या आठवणी आज गोड ठरण्याऐवजी कटू ठरल्या आहेत. १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करूनही त्यांच्या माथी लागलेला संशयित कोरोनाग्रस्ताचा शिक्का अद्याप पुसला गेलेला नाही.
संपूर्ण देशासह मुंबईवर ओढवलेल्या कोरोनारूपी संकटापासून नागरिकांना वाचविण्यासाठी डॉक्टर- पोलीस झुंज देत आहेत. त्याचवेळी या आजाराची लागण झालेल्या सदस्याच्या परिवाराला अस्पृश्यतेसमान वागणूक दिली जात आहे. १४ दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केल्यानंतरही त्या व्यक्तीच्या घरातील सदस्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. आपल्या शेजारची व्यक्ती कोरोनाबाधित असल्याच्या संशयाने लोक अशा कुटुंबाला वाळीत टाकू लागले आहेत. असाच काहीसा अनुभव दादर पश्चिम येथे राहणाºया एका कुटुंबाने नुकताच घेतला.
या कुटुंबातील व्यक्ती आपल्या मुलासह जानेवारी महिन्यात युरोप टूरवर गेली होती. मधल्या काळात कोरोनाचा प्रकोप वाढल्यामुळे ते मायदेशी परतले. मात्र विमानतळावरून त्यांना थेट सेव्हन हिल्स रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आले. तिथे त्यांची तपासणी केल्यानंतर खबरदारी म्हणून वडील आणि मुलाला होम क्वारंटाइन करण्यास सांगण्यात आले. सुदैवाने या १४ दिवसांमध्ये त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही त्यांच्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन मात्र बदलला आहे.
गॅस सिलिंडरही देण्यास नकार...
आजूबाजूचे पूर्वीसारखे बोलत नाहीत. आम्हाला कोरोना झालेला नाही हे सांगूनही त्यांच्या मनातील भीती काही जात नाही. त्यांना त्यांच्या जीवाची चिंता असेल. पण गॅस सिलिंडरही दिला जात नाही, याबाबत काय म्हणावे, अशी नाराजी या व्यक्तीने व्यक्त केली. त्यांच्या घरातील सिलिंडर संपल्यामुळे त्यांनी गॅस एजन्सीला फोन केला. खबरदारी म्हणून त्यांनी आपल्याला होम क्वारंटाईन केले असल्याची कल्पना डिलिव्हरी करणाºया व्यक्तीला दिल्यावर त्यांनी येण्यास नकार दिला.