रुग्णालयातून बरे झाल्यावर देखील कोरोना रुग्णाला घरी स्वीकारण्यास घरच्यांची तयारी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 06:32 PM2020-05-31T18:32:21+5:302020-05-31T18:32:38+5:30
कोरोनाचा विळखा समाजाच्या मोठ्या वर्गाला बसत असताना आता कोरोनामुळे नातेसंबंध देखील धोक्यात येऊ लागले आहेत.
मुंबई : कोरोनाचा विळखा समाजाच्या मोठ्या वर्गाला बसत असताना आता कोरोनामुळे नातेसंबंध देखील धोक्यात येऊ लागले आहेत. वडाळा अँटॉप हिल य़ेथील एका महिलेला कोरोनाची लागण झाली. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी देखील सहाय्यक पालिका आयुक्तांशी संपर्क साधावा लागला. सात दिवस शीव येथील सोमय्या कोविड केअर केंद्रात उपचार घेतल्यावर त्या महिलेला घरी जाण्याची परवानगी देण्यात आली. मात्र या महिलेला घरी दाखल करुन घेण्यासाठी कुटुंबिय विरोध करत असल्याचे समोर आले. या महिलेमुळे घरच्या इतर सदस्यांना देखील कोरोना व्हायची भीती असल्याने या महिलेला घरी घेण्यास टाळाटाळ केली जात होती. शेवटी सामाजिक कार्यकर्त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करुन त्यांची समजूत काढावी लागली तेव्हा कुठे त्या महिलेचे कुटुंबिय तिला घरी घेण्यासाठी तयार झाले.
कोरोना मधून पूर्ण बरे झाल्यानंतर व वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरही या महिलेला घरी स्वीकारण्यास नकार दिला जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. कोरोना मुळे नातेसंबंध धोक्यात येत असल्याने ही एक नवीन समस्या उदभवू लागली आहे. अनेक प्रकरणांमध्ये कोरोना ग्रस्त व्यक्तीच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिल्याने व अशा मृतदेहांवर महापालिकेला अंत्यसंस्कार करावे लागले आहेत. कोरोना मुळे नागरिकांमध्ये प्रचंड धास्ती असल्याने स्वत:च्या कुटुबियांना घरी स्वीकारण्यास टाळाटाळ व मना ई केली जात असल्याने हा आजार समाजाला कुठल्या दिशेने घेऊन जाईल हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वडाळा येथील प्रकरणी कुटुंबिय महिलेला घरी स्वीकारण्यास नकार देताना सोसायटीच्या विरोधाचे कारण देत होते मात्र पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्याचा व कारवाई करण्याचा इशारा दिल्यानंतर मात्र कुटुंबियांनी या शेवटी महिलेला घरी दाखल करुन घेतले. कोरोनाचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर व उपचार घेऊन बरे झाल्यानंतर देखील घरी स्वीकारण्यास मनाई केली जात असल्याने महिलेने खंत व्यक्त केली.