एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:06 AM2021-07-30T04:06:35+5:302021-07-30T04:06:35+5:30

मुंबई : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची देयके सन २०१९ सालापासून प्रलंबित आहेत. रजेचे वेतन व कराराचा फरक ...

Even after the retirement of ST employees | एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल

एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल

Next

मुंबई : एसटी महामंडळाच्या सेवानिवृत्तांची व मृत कर्मचाऱ्यांची देयके सन २०१९ सालापासून प्रलंबित आहेत. रजेचे वेतन व कराराचा फरक अद्यापि त्यांना दिलेला नाही. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीनंतरही हाल होत असून म्हातारपणाची रक्कम मिळता मिळत नाही. जवळ पैसे नसल्याने सेवानिवृत्त कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

राज्यातील कर्मचाऱ्यांची देणी २०१८ पासून थकीत होती. मात्र, कामगार संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर काही देणी देण्यात आली असून जानेवारी २०१९ पासूनची देणी बाकी आहेत. संपूर्ण आयुष्य तुटपुंज्या पगारात एसटी महामंडळाच्या सेवेत झिजवल्यानंतरसुद्धा महामंडळाच्या निवृत्त एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांचे स्वतःच्या हक्काचे पैसे महामंडळाकडून थकविण्यात आले आहेत. पैशांची चणचण असल्याने पैसे मिळविण्यासाठी निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना विभागीय कार्यालयात चकरा माराव्या लागत आहे. मात्र, अद्यापपर्यंत महामंडळाने निवृत्त कामगारांचे पैसे दिलेले नाहीत, ही रक्कम देण्यासाठी एसटी महामंडळाकडे निधी नाही.

एसटी महामंडळात निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतरचे रजेचे पैसे व वेतनवाढ फरकाचे पैसे महामंडळाकडून दिले जातात. मात्र, जानेवारी २०१९ पासून राज्यभरातील निवृत्त झालेल्या एसटी कर्मचारी व अधिकाऱ्यांना ही रक्कम अद्यापही महामंडळाकडून मिळालेली नाही.

सेवानिवृत्तांची देणी अद्याप प्रलंबित आहेत. रजा रोखीकरण आणि एकतर्फी वेतनवाढीचा फरक अद्यापि प्रलंबित आहे. विभागीय कार्यालयात फे-या मारून अक्षरश: दमछाक होत आहे. ज्या कामगारांनी रोपट्याचा वटवृक्ष केला त्यांना औषधोपचारालादेखील पैसा नाही. ही रक्कम एकरकमी देण्यात यावी, अन्यथा संघटनेकडून आंदोलन करण्यात येईल.

- संदीप शिंदे, अध्यक्ष महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटना

इतरांच्या तुलनेत एसटी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी आहे. त्यामुळे साहजिकच त्यांना निवृत्तीनंतरची रक्कमसुद्धा कमी मिळते. त्यातही सदर रक्कम थकीत राहिल्याने निवृत्त कर्मचारी व अधिकारी संकटात सापडले आहेत. यातील काही कर्मचाऱ्यांना कोरोना प्रादुर्भाव झाल्याने त्यांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले आहेत. त्यांना औषध उपचारासाठीसुद्धा रक्कम कामी आलेली नाही.

सेवानिवृत्त वाहक, एसटी महामंडळ,

मुंबई विभाग एकूण कर्मचारी /अधिकारी

अधिकारी -१३

प्रशासन -३२४

चालक -६५७

वाहक- ४५६

कार्यशाळा -३७०

एकूण -१८२०

Web Title: Even after the retirement of ST employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.