सात वर्षांनंतरही आठ तास कर्तव्याचे पोलिसांचे स्वप्नच; आणखी एकाचा बळी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2023 07:42 AM2023-05-05T07:42:48+5:302023-05-05T07:43:00+5:30
पूर्णतः अंमलबजावणी करण्याची मागणी
मुंबई - खार पोलिस ठाण्यातील सहायक फौजदार सुधीर बने यांचे राहत्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रात्रपाळीत कर्तव्य बजावून ते घरी आले होते. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याबरोबरच पोलिसांवरील ताणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे पोलिसांना आठ तास ड्यूटी या योजनेची अंमलबजावणी सात वर्षांनंतरही केली जात नसल्याने पोलिसांच्या रागात भर पडताना दिसत आहे. मुंबईतील सुरक्षेसह शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पार पाडत असलेल्या मुंबई पोलिसांवर कामाचा सर्वात जास्त अधिक ताण असून, त्यांच्या दैनंदिन कर्तव्याचे निश्चित असे तासच नाहीत.
अंमलबजावणी होणे गरजेचे
बने हे व्यायाम, जाॅगिंग नियमितपणे करत होते. त्यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला. पोलिस दलात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. पोलिस दलातील कर्तव्याला किमान १२-२४ ला तरी निदान प्राधान्य द्यावे. ८-८ तासाचे गाजर काही महिने दाखवून पुन्हा जैसे थेचा कारभार सुरूच आहे. काही ठिकाणी वरिष्ठ ऐकत नाही तर काही ठिकाणी इंचार्ज ऐकत नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
प्रस्ताव काय आहे?
अन्य आस्थापनांप्रमाणेच मुंबई पोलिसांच्या ड्यूट्या आठ तास करण्याच्या उपक्रमाचा प्रस्ताव देवनार पोलिस ठाण्यातील रवींद्र पाटील यांनी तत्कालीन पोलिस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्या समोर मांडला. ५ मे २०१६ रोजी देवनार पोलिस ठाण्यासोबत काही पोलिस ठाण्यांमध्ये आठ तास ड्यूटीचा प्रयोग सुरू करण्यात आला. उपक्रम यशश्वी ठरू लागल्यानंतर शहरातील सर्व पोलिस ठाण्यात हा उपक्रम राबविण्यासाठी पडसळगीकर यांनी प्रयत्न केले. १ जानेवारी २०१७ पासून मुंबईत सर्वत्र याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय पडसळगीकर यांनी घेतला.
८ तास ड्यूटीच्या उपक्रमाचे योग्य नियोजन करण्याची जबाबदारी त्यांनी पाटील यांच्याकडे दिली. तेव्हापासून पाटील यांची कक्ष ८ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. सुरुवातीला चारजण त्यांच्यासोबत कर्तव्यावर होते. लाॅकडाउनच्या काळात हा उपक्रम बारगळला. तसेच कक्ष ८ मधील दोन कर्मचाऱ्यांना कमी करण्यात आले.
संजय पांडे यांच्या कारकिर्दीत...
संजय पांडे यांनी पोलिस आयुक्त पदाची धुरा सांभाळल्यानंतर दुसऱ्याच आठवड्यात महिला पोलिसांना ८ तास ड्यूटीची भेट दिली. त्यापाठोपाठ मुंबई पोलिस दलातील ५० वर्षांपुढील पोलिसांना १२ तास कर्तव्य २४ तास आराम, तर ५० वर्षांखालील पोलिस अंमलदार आणि अधिकाऱ्यांना आठ तास ड्यूटी देण्याचे आदेश दिले. यासाठी नेमलेल्या समितीमध्येदेखील पाटील यांना घेतले होते. मात्र, पांडे हे सेवानिवृत्त झाले आणि पाटील यांची नुकतीच नेहरू नगर पोलिस ठाण्यात बदली करण्यात आली आहे. आजही काही ठिकाणी आठ तास कर्तव्य सुरू आहे तर काही ठिकाणी आजही परिस्थिती जैसे थे स्वरूपात आहे. आज सात वर्षानंतरही आठ तास ड्यूटी हे पोलिसांसाठी स्वप्नच असल्याचे चित्र पहावयास मिळते.