उल्हासनगर : उल्हासनगरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा होण्यासाठी तसेच ४० टक्के पाणीगळती रोखण्याच्या दृष्टीने उल्हासनगर महापालिकेकडून केंद्र शासनाच्या मदतीने पाणीपुरवठा योजनेचे काम हाती घेण्यात आले. १२५ कोटींचा खर्च असलेली ही योजना तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींवर पोहोचली असली तरी अनेक ठिकाणी जलवाहिनीची कामे अर्धवट आहेत. यामुळे बहुतांश भागांमध्ये पाणीटंचाई कायम असून, पालिकेच्या उधळपट्टीवर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.पाणीपुरवठा योजनेचा खर्च तिसऱ्या टप्प्यात ३०० कोटींवर गेला आहे. मात्र अद्याप कामे पूर्ण झालेली नाहीत. अनेक प्रभागांमध्ये पाणीटंचाई कायम असल्याने नगरसेवकांनी महासभेत आंदोलन केले होते. यानंतर पालिकेकडून लहान-लहान जलवाहिन्या टाकण्याचे काम हाती घेण्यात आले. यासाठी लहान जलवाहिन्या टाकण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करीत असल्याचे उघड झाले आहे. लालचक्की ते व्हीनस चौकादरम्यान अशीच जलवाहिनी टाकण्यात येत आहे. ठेकेदाराच्या हितासाठी व नगरसेवकांना शांत करण्यासाठी कोट्यवधींची उधळपट्टी होत असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या नगसेवकांनी केला आहे. शहराचे १३ कि.मी. क्षेत्रफळ असून, यासाठी ३०० कोटींच्या जलवाहिन्या लागणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा योजनेत भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत या योजनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी झाल्याने ठेकेदाराचे धाबे दणाणले आहे. योजनेत कोणाला किती वाटा मिळाला तेही उघड होणार असल्याचे मत विरोधी नगरसेवकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, शहरातील बहुतांश झोपडपट्टी भागात जलवाहिन्या टाकण्यात न आल्याचा आरोप नगरसेवकांनी केला आहे. यामुळे झोपडपट्ट्यांमधील रहिवाशी पाण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (वार्ताहर)----------जलवाहिन्या टाकण्यासाठी खोदलेले रस्ते ठेकेदाराने दुरुस्त करण्याची अट आहे. मात्र बहुतांश ठिकाणी याकामी खोदलेले रस्ते पालिकेने २५ ते ३० कोटी रुपये खर्चून दुरुस्त केल्याचे समोर आले आहे. ठेकेदाराला रस्ते दुरुस्तीबाबत विशेष सूट देणारे सत्ताधारी व विरोधी पक्ष यासंदर्भात चकार शब्द काढत नसल्याने त्याचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.----------उल्हासनगरात ११ जलकुंभ, एक भूमिगत जलकुंभासह दोन पम्पिंग स्टेशन तसेच प्रभागांमध्ये विविध व्यासाच्या जलवाहिन्या टाकण्याचे काम ५ वर्षांपूर्वी कोणार्क कंपनीला देण्यात आले होते. गेल्या पाच वर्षांत यातील केवळ ७० टक्केच काम झाल्याचा दावा नगरसेवकांनी केला आहे; तर ९० टक्के काम झाल्याचे पालिकेने कागदोपत्री म्हटले आहे.
तीनपट खर्च करूनही कामे अर्धवट
By admin | Published: June 29, 2015 2:55 AM