Join us

सात रहिवाशांच्या मृत्यूनंतरही ‘जय भवानी’ला पाण्याची आशाच, कागदपत्रांच्या पूर्ततेनंतर प्रश्न सोडविण्याची महापालिकेची भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2023 9:42 AM

गेल्या १५ वर्षांपासून पाण्याविना राहणाऱ्या येथील रहिवाशांना आता पाणीपुरवठ्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे. मात्र, त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. 

मुंबई : गोरेगाव येथील जय भवानी एसआरए इमारतीला शुक्रवारी लागलेल्या आगीत सात जणांचा गुदमरून मृत्यू झाला. या दुर्घटनेनंतर इमारतीच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न  ऐरणीवर आला. गेल्या १५ वर्षांपासून पाण्याविना राहणाऱ्या येथील रहिवाशांना आता पाणीपुरवठ्याची तयारी महापालिका प्रशासनाने दाखवली आहे. मात्र, त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने (एसआरए) कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याची भूमिका पालिकेने घेतली आहे. 

जय भवानी इमारतीतील रहिवासी गेल्या १५ वर्षांपासून पाण्यासाठी वणवण भटकत आहेत. सातही मजल्यांवरील रहिवाशांना पाण्यासाठी इतर ठिकाणी जावे लागते. शुक्रवारी आग लागली त्यावेळी आग विझविण्यासाठीही पाणी इमारतीत नव्हते. 

... तर लगेचच पाणीपुरवठा सुरू करूआगीच्या दुर्घटनेमुळे जयभवानी इमारतीच्या पाणीपुरवठ्या संदर्भातील धक्कादायक बाबी उघड झाल्या. त्यानंतर खडबडून जाग्या झालेल्या पालिका प्रशासनाने या प्रश्नाची दखल घेतली. महापालिकेच्या पी दक्षिण विभागाचे सहायक आयुक्त राजेश अक्रे यांनी शनिवारी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी केली. 

इमारतीच्या पाणी पुरवठ्यासंदर्भातील सर्व अटी-शर्तींची पूर्तता केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाणीपुरवठा सुरू केला जाईल, असे त्यांनी सांगितले. एसआरएने या इमारतीत पाण्याची टाकी बांधणे, पाण्याची जोडणी करणे आणि पालिकेला देय असलेली रक्कम अदा करणे इत्यादी बाबींची पूर्तता करावी, अशी भूमिका त्यांनी मांडली. 

मुख्यमंत्र्यांना साकडे  -    मृतांच्या नातेवाइकांना नुकसानभरपाई मिळावी रुग्णालयातील जखमींवर मोफत उपचार करण्यात यावे-    ज्यांच्या घराचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे, त्यांना भरपाई मिळावी, इमारतीला ओसी देण्यात यावी, महापालिकेने पाण्याचा पुरवठा करावा-    इमारतीची बंद असलेली लिफ्ट सुरू करण्यात यावी, इमारतीची फायर फायटिंग यंत्रणा सुरू करावी, इमारतीचा विमा काढण्यात यावा-    इमारतीमधील पार्किंगची जागा दुसऱ्या इमारतीसाठी वापरली जाते; ही जागा एसआरएमधील रहिवाशांना मिळावी, इमारतीला संरक्षण भिंत आणि प्रवेशद्वार बसविण्यात यावे-    सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत, बिल्डरवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.

टॅग्स :मुंबई महानगरपालिकापाणी